आनंदवार्ता! आता दीड महिन्यात निकाल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

- फेरमुल्यांकनाचा निकालाला लागत होता उशीर 
- नागपूर विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रक्रियेस सुरुवात 
- परीक्षा विभागाचा दावा 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेच्या निकालानंतर फेरमूल्यांकनाच्या निकाल लावण्यात सातत्याने उशीर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे दुसरी परीक्षा आली तरी निकाल मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना बराच मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे फेरमूल्यांकनाचे निकाल वेळेत लावण्यासाठी परीक्षा विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता केवळ दीड महिन्यात फेरमूल्यांकनाचा निकाल येईल, असा दावा परीक्षा विभागाने केला आहे. 
फेरमूल्यांकनाचे निकाल वेळेत लावणे गेल्या दीड दशकांपासून विद्यापीठाची डोकेदुखी ठरले आहेत. विद्यापीठाच्या प्रत्येक परीक्षेनंतर फेरमूल्यांकन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येते. फेरमूल्यांकनाचे निकाल रखडल्याने बरेचदा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण होत असते. पुन्हा त्याच विषयाचा पेपर देण्याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो.

नियमानुसार विद्यापीठाद्वारे 30 ते 45 दिवसांच्या आत निकाल लावण्याचे काम करण्यात येते. त्यातच एकदा पेपरचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना दुसऱ्यांदा त्याच पेपरचे मूल्यांकन करता येत नसल्याचा नियम असल्याने फेरमूल्यांकन करण्यासाठी प्राध्यापक मिळत नसल्याची तक्रार असते. त्यामुळे पुन्हा मूल्यांकनासाठी वेळ वाया जातो. साधारणत: निकाल लागल्यावर दहा दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना फेरमूल्यांकनासाठी अर्ज करावा लागतो.

त्यानंतर अर्ज तपासून तो मंजूर करीत झेरॉक्‍ससाठी पाठविण्यात येते. त्यानंतर झेरॉक्‍स मिळाल्यावर त्यावर आक्षेप नोंदविणे या प्रक्रियेत महिन्याभराचा कालावधी निघून जातो. त्यानंतर मूल्यांकनासाठी बराच वेळ लागत असल्याने निकालास उशीर होतो. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यापासून तर झेरॉक्‍स आणि इतर सर्वच गोष्टी ऑनलाइन करीत लागणारा अधिकचा कालावधी कमी करण्याचे ठरविले आहे. 

"अप्लाय फॉर रिव्हॅल्युएशन' ऑनलाइन सुविधा 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आता विद्यार्थ्यांना "अप्लाय फॉर रिव्हॅल्युएशन' या ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सुविधेमुळे फेरमूल्यांकनाचे निकाल वेळेत लावण्यात बराच कमी वेळ लागणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने फेरमूल्यांकन वेळेत करण्यास मदत होईल. फेरमूल्यांकनाचे निकाल वेळेत आल्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त परीक्षा देण्याचा मानसिक त्रास कमी होणार आहे. 
- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Results in a month and a half now