Amravati : सत्ताधाऱ्यांच्या दबावात सूडबुद्धीने कारवाई ; फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis

सत्ताधाऱ्यांच्या दबावात सूडबुद्धीने कारवाई ; फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ‘अमरावती येथे झालेली दंगल ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र, असे असतानाही सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन पोलिसांकडून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे,’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. सत्ताधाऱ्यांच्या या नीतीविरोधात भाजपकडून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीमधील दंगल झालेल्या भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, ‘‘वास्तविक १२ नोव्हेंबरला अमरावतीसह राज्यातील मालेगाव आणि नांदेड येथेसुद्धा चुकीच्या व ‘फेक न्यूज’च्या आधारे हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. अमरावतीत पोलिस यंत्रणा व गुप्तचर विभाग परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. १२ नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी लोकांनी आधी दुकानांवर दगडफेक करून या वादाची बीजे रोवली.

तर, दुसऱ्या दिवशी त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. या घटनेबाबत सत्तापक्ष आणि पोलिस यंत्रणा काहीच बोलायला तयार नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी उसळलेल्या प्रतिक्रियेनंतर हजारो कार्यकर्त्यांवर तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर खोट्या केसेस लावून त्यांना लक्ष्य केले जात आहे.’’ केवळ १३ नोव्हेंबरच्या घटनेबाबत अमरावती जिल्ह्यात कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राजकीय ध्रुवीकरणाचा आरोप

भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकासात्मक कामांमध्ये आपण पराभूत करू शकत नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर काँग्रेस आणि समविचारी पक्षांकडून दंगलीच्या माध्यमातून राजकीय ध्रुवीकरण करण्यात येत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

हेही वाचा: नागपूर : कृषी कायदा मागे : कॉंग्रेसने फोडले फटाके

रझा अकादमीवर बंदी घालावी

रझा अकादमीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चानंतर प्रत्येक वेळी हिंसाचार, जाळपोळ झालेली आहे, हा इतिहास आहे. रझा अकादमी भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप निराधार आहे. आम्ही स्वतःच रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

loading image
go to top