प्रतवारी घसरली; धानाला लिलावाची प्रतीक्षा, व्यापाऱ्यांनीही फिरविली खरेदीकडे पाठ

विनायक रेकलवार
Tuesday, 5 January 2021

धान उत्पादक पट्टा म्हणून मूल तालुक्‍याची ओळख आहे. मागीलवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षीही हातात आलेल्या पिकाला किडीने ग्रासले. मावा, तुडतुडा आणि अवकाळी पावसामुळे धानाचे नुकसान झाले.

मूल (जि. चंद्रपूर) :  धानाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुले मार्केट यार्डमध्ये धान  मोठ्या प्रमाणात लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा धानाची प्रतवारी योग्य नसल्याचे व्यापारी, दलाल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धानाला उठाव नसल्याची प्रतिक्रिया आहे. धान खरेदीसाठी व्यापारी पाठ फिरवीत असल्याने बाजार समितीच्या आवारात मोठा साठा पडून आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपणी; नागपूरकर माझा आवाज का बंद करता?

धान उत्पादक पट्टा म्हणून मूल तालुक्‍याची ओळख आहे. मागीलवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षीही हातात आलेल्या पिकाला किडीने ग्रासले. मावा, तुडतुडा आणि अवकाळी पावसामुळे धानाचे नुकसान झाले. त्याचा परिणाम धानाचे उत्पन्न कमी झाले. धानाची प्रतवारीही घसरली. येथे रोजच्या रोज चाळीस ते पन्नास हजार धानपोत्यांची आवक होत असली तरी त्यामानाने धानाचा लिलाव मात्र कमी होत आहे. श्रीराम जातीच्या धानाचा बराचशा साठा रोज येत आहे. धान खरेदीचा हंगाम येथे सुरू झाला. मात्र, योग्य उठाव होत नसल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चांगल्या जातीच्या धानास भाव मिळत असला तरी इतर धानास योग्य भावाअभावी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - एटीएम क्‍लोनिंगचा म्होरक्‍या गजाआड; तपास पथकाने एकाला मुंबई येथून घेतले ताब्यात

जवळपास सत्तर टक्‍के धानाचे पोते बाजार समितीत लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. धानाला उठाव नसल्याने धानाच्या पोत्यांनी बाजार समितीचा यार्ड भरून आहे. उत्कृष्ट जातीच्या धानाचा रोजच्या रोज लिलाव होत असला तरी या कमी प्रतवारीच्या धानाकडे व्यापारी पाठ फिरवीत आहेत. याचा फटका बाजार समितीसह व्यापाऱ्यांना बसला आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे बाजार  समितीला फटका बसत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेतमाल खरेदी करीत असल्यामुळे बाजार समितीत आलेल्या शेतमालाला स्पर्धक उरला नाही. त्याबरोबर यावर्षी झालेल्या रोगराईमुळे धानाची प्रतवारी घसरली. कृषी कायदयामुळे बाजार समितीला फटका बसला आहे. 
-घनश्‍याम येनुरकर, सभापती, कृऊबास मूल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice crop not selling in mool of chandrapur