जिल्हाधिकारी म्हणतात घराबाहेर पडू नका; तुम्हीच व्हा स्वत:चे रक्षक!

Papalkar_web.JPG
Papalkar_web.JPG

अकोला :  जगभर धुमाकूळ माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (व्हायरस) राज्यात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. या वातावरणात नागरिकांनी घाबरुन न जाता विशेष काळजी घ्यावी व कोरोनाचे वाहक न होता त्याच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी घरातच राहावे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास मृत्यू होते असा लोकांचा गैरसमज आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्युदरावर नजर टाकल्यास एक हजार रुग्णांपैकी 998 रुग्ण बरे होतात. म्हणजेच कोरोनाचा मृत्युदर कमी आहे. परंतु त्याचा संसर्ग वेगाने होतो म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची खबरदारी घेणे आवश्‍यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. असे असले तरी सोमवारपर्यंत (ता. 6) जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही, परंतु लॉकडाउननंतर 14 व्या दिवशी या विषाणूचा महापालिका हद्दीत पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी कारण जिल्हा प्रशासनाने कोरोनाला हरवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात सॅनिटायझेश करण्यात आले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत शासनाच्या 18 विभागांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यासोबतच विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा केली आहे. दोन हजार 48 मजूर, कामगार, स्थलांतरित नागरिकांसाठी प्रशासनाने जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे.

परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या 26 हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु 14 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे बाकी असल्यामुळे त्यांची प्रशासन व आरोग्य विभागामार्फत नियमित ट्रॅकिंग करण्यात येत आहे. याव्यतिरीक्त इतर प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळे नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता विशेष काळजी घ्यावी व घरातच राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे. 

152 पलंगांचे कोरोना हॉस्पिटल
कोरोनाग्रस्त नागरिकांच्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना हॉस्पिटल बनवण्यात आले आहे. 152 पलंगांची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक व इतरांना कोरोनासंदर्भात प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. याव्यतिरीक्त सॅनिटायझर, मास्क व इतर वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास खाजगी रुग्णालय, होस्टेल सुद्धा ताब्यात घेवून नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. 

डीपीसीतून 5 कोटी; 75 हजार पीपीई कीटची मागणी
कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय चमूंसाठी शासनाकडे 75 हजार पीपीई कीटची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) पाच कोटी रुपये सुद्धा देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासल्यास खाजगी रुग्णालयांतील व्हेंटिलेटर सुद्धा प्रशासन ताब्यात घेईल. 

शेतकरी व गरजूंना धान्याचा लाभ
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकरी, प्राधान्य गट व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्राच्या निर्देशाप्रमाणे मोफत तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यासोबत राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यल्प दरात धान्याचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त गरजूंना 40 एनजीओंच्या सहकार्यांने धान्याचे वाटप करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com