अमरावतीच्या ऋतुजा जाधवची ’ॲस्ट्राझेनिका' भरारी; झाले जीवनाचे सार्थक

सुधीर भारती
Saturday, 31 October 2020

ऋतुजा जाधव हिने गोल्डन किड्‌स स्कूलमध्ये १० वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती कोटा राजस्थानला गेली. त्याठिकाणी ११ वी तसेच १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये तिची निवड आयआयटी मद्रास या नामांकित संस्थेत झाली. याच ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित अशा ॲस्ट्राझेनिका या कंपनीत आयटी विभागात तिची निवड झाली.

अमरावती : लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले, चिंचोलीसारख्या लहानशा गावात वास्तव्य, घरची परिस्थिती जेमतेम, अशा विपरीत परिस्थितीतही न डगमगता आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या कन्येची ॲस्ट्राझेनिकासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनावरील लशीचे काम सुरू असून ॲस्ट्राझेनिका या कंपनीचे नाव सर्वांत वरच्या क्रमांकावर घेतले जाते.

मामांमुळे झाले जीवनाचे सार्थक

ऋतुजा संजय जाधव, असे गगनभरारी घेणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ऋतुजा लहान असतानाच तिचे वडील संजय जाधव यांचे एका अपघातात निधन झाले. एकप्रकारे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. संपूर्ण जबाबदारी आई ज्योती जाधव यांच्यावर आली. मात्र ज्योती जाधव यांचे दोन बंधू तारकेश्‍वर घोटेकर तसेच योगीराज घोटेकर यांनी आपल्या बहिणीला अमरावतीला आणले. त्यामुळे मामांनीच तिच्या जीवनाचे सार्थक केले. येथून ऋतुजाच्या जीवनाला एक कलाटणीही मिळाली.

अवश्य वाचा : संत्राच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा; व्यापाऱ्यांच्या भावाला बळी पडू नये

आयआयटी मद्रासमध्ये झाले शिक्षण

गोल्डन किड्‌स स्कूलमध्ये १० वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती कोटा राजस्थानला गेली. त्याठिकाणी ११ वी तसेच १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये तिची निवड आयआयटी मद्रास या नामांकित संस्थेत झाली. तोपर्यंत तिला फार्मा क्षेत्राबाबत काही कल्पना नव्हती.

जाणून घ्या : मेळघाटच्या भरारी पथकातील डॉक्‍टरांसह रुग्णांचा जीव धोक्‍यात; खिळखिळ्या वाहनाचा होतोय उपयोग

कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड

मात्र आयआयटी मद्रासमध्ये शिकत असताना याच क्षेत्रात करिअर करावे, असे तिला वाटू लागले आणि त्या दिशेने ऋतुजाचा प्रवास सुरू झाला. याच ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित अशा ॲस्ट्राझेनिका या कंपनीत आयटी विभागात तिची निवड झाली आणि तिची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली. अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rituja Jadhav of Amravati selected in Astrazeneca Company