कासवाच्या गतीने चालले रस्त्याचे काम; भाजपचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

हिंगणा सुकळी गुपचूपमार्गे गुमगाव नवीन रस्त्याचे बांधकाम मधुकाम इन्फ्रा कंपनी हैदराबादला देण्यात आले. साधारणतः दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम कंपनीने सुरू केले.

हिंगणा (जि.नागपूर) : वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणा-गुमगाव मार्गाचे रस्त्याचे काम मधुकाम इन्फ्रा कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले. कामाचा कालावधी लोटूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे या कंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदार समीर मेघे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

अपघात होण्याची दाट शक्‍यता
निवेदनात म्हटले आहे की, हिंगणा सुकळी गुपचूपमार्गे गुमगाव नवीन रस्त्याचे बांधकाम मधुकाम इन्फ्रा कंपनी हैदराबादला देण्यात आले. साधारणतः दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम कंपनीने सुरू केले. बांधकामासाठी दिलेला अवधी संपला असतानाही बांधकाम पूर्ण झाले नाही. यामुळे हिंगणा-गुमगाव मार्ग जनतेसाठी डोकेदुखी ठरला आहे. परिसरातील शेतपिकांवरही रस्त्यावरील धूळ उडत असल्याने पिकांचेही नुकसान होत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीला तातडीने काम सुरू करण्यास सांगितले होते. मात्र, कंपनीने या सूचनेकडे दुर्लक्ष केले. या मार्गावर अपघातही होण्याची दाट शक्‍यता आहे.

हिंगणा-गुमगाव रस्ता बांधकाम प्रकरण
कंपनीच्या विश्‍वसनियतेचा प्रश्‍न उपस्थित करून कंपनीने रस्ता बांधकाम थंडबस्त्यात का ठेवले, या प्रकरणाची चौकशी करावी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी केली. हिंगणा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक अरविंद रघुवंशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आमदार समीर मेघे, भाजप नेते धनराज आष्टणकर, विशाल भोसले, उमेश आंबटकर, विकास दाभेकर, अजय घवघवे यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work carried out by the caravan; BJP's accusation