शेतात क्वारंटाईन केल्याने त्यांनी दागिने दिले दुसऱ्याच्या घरी ठेवायला अन् त्याच्याच घरी झाली चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

मेहकर तालुक्यातील जानेफळ रोडवर असलेल्या फर्दापुर याठिकाणी गुलाब बाबूराव पाडमुख यांच्या घरी 24 मेच्या रात्रीला चोरट्यांनी घर फोडून चोरी केली.

मेहकर (जि.बुलडाणा) : मेहकर पासून जवळच असलेल्या फर्दापुर येथे 24 मे ला रात्रीच्या चोरट्यांनी घर फोडून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी घर मालकांनी 25 मे ला मेहकर पोलिस स्टेशनला तोंडी रिपोर्ट दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीवर ठेवले आहे.

मेहकर तालुक्यातील जानेफळ रोडवर असलेल्या फर्दापुर याठिकाणी गुलाब बाबूराव पाडमुख यांच्या घरी 24 मेच्या रात्रीला चोरट्यांनी घर फोडून चोरी केली. यामध्ये रोख रक्कम 1 लाख 14 हजार, तीन तोळे सोने, एक तोळा चांदी असा अंदाजे जवळपास दोन लाख रुपयांचा माल लंपास केला. गुलाब पाडमुख यांनी 26 मे ला सकाळी मेहकर पोलिस स्टेशनला तोंडी फिर्याद दिली. 

हेही वाचा - Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोना प्रवेश

गुलाब पाडमुख, साडू सिद्धार्थ मिसाळ व त्यांच्या पत्नी कल्पना सिद्धार्थ मिसाळ राहणार औरंगाबाद हे फर्दापुर येथे आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर सिद्धार्थ मिसाळ व कल्पना मिसाळ यांना शेतामध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान सिद्धार्थ मिसाळ यांनी त्यांच्या जवळ असलेले एक लाख 14 हजार व सोने-चांदी हे गुलाब पाडमुख यांच्याजवळ ठेवण्यासाठी दिले होते. 

गुलाब पाडमुख यांनी ही सर्व रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने आपल्या घरी ठेवले होते. गुलाब पाडमुख त्यांचे पाहुणे सिद्धार्थ मिसाळ यांच्यासोबत शेतामध्ये होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली. यासंदर्भात मेहकर पोलिसांकडून दोन दिवसापासून सदर प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery lakhs of rupees in cash and gold and silver jewelery in buldana district