शेतात तीन पेटी सोने असल्याची मिळाली माहिती; त्यासाठी टाकला दरोडा, पण घडले वेगळेच 

संजय भोसले 
Thursday, 3 September 2020

ढाणकी ते खरूस रोडवरील शेतकरी संजय जिल्हावार यांच्या शेतातील सालगडी व त्याचा परिवार वास्तव्यास आहे. 29 ऑगस्टला सालगडी, पत्नी व मुलाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत 20 हजार रुपये किमतीचे सोने लुटले. दुसर्‍या सालगड्याला विहिरीत ढकलून दिले. सालगडी नागोराव वामन डहाके यांनी बिटरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ढाणकी (जि. यवतमाळ)  : शेतातील सालगड्यासह पत्नी व मुलाला शस्त्राने मारहाण करून 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना गेल्या 29 ऑगस्टला रात्री नऊ वाजता ढाणकी ते खरूस शिवारात घडली होती. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत दहा जणांना गजाआड केले. शेतात तीन पेटी सोने असल्याची माहिती मिळाल्याने दरोडा टाकला, अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली.

विश्‍वनाथ शिंदे (वय 22, रा. उमरी, जि. नांदेड), शुभम अडकीने (वय 21, रा. भोकर), मनोज उर्फ चंद्रकांत मनोरवार (वय 31, रा. भोकर, जि. नांदेड), विकास परिमल (वय 39, रा. ढाणकी, जि. यवतमाळ), रामचंद्र संजेवाड (वय 18, रा. भोकर), सूरज सावते (वय 21, रा. पवना, ता. हिमायतनगर), चंद्रकांत सावते (वय 28, रा. पवना), धम्मदीप राऊत (वय 21, रा. पवना), अजय राऊत (वय 20, रा. पवना), नितीन अडुलवार (वय 20, रा. उमरी, ता. हिमायतनगर) अशी दरोडा टाकणार्‍यांची नावे आहेत. 

हेही वाचा - या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?
 

ढाणकी ते खरूस रोडवरील शेतकरी संजय जिल्हावार यांच्या शेतातील सालगडी व त्याचा परिवार वास्तव्यास आहे. 29 ऑगस्टला सालगडी, पत्नी व मुलाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करीत 20 हजार रुपये किमतीचे सोने लुटले. दुसर्‍या सालगड्याला विहिरीत ढकलून दिले. सालगडी नागोराव वामन डहाके यांनी बिटरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. 

जिल्हावार यांच्या शेतात तीन पेटी सोने असल्याची माहिती ढाणकी येथील विकास परिमल याने चंद्रकांत सावते याला दिली. त्यावरून साथीदारांची जुळवाजुळव करून जिल्हावार यांच्या शेतात दरोडा टाकला. मात्र, हाती काहीच लागले नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनेचा छडा लावत दहा जणांना अटक केली. दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन, तलवार, चाकू, मोबाईल असा एकूण दहा लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

विशेष म्हणजे या गुन्ह्यात कलम 397 भादंवि वाढविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, प्रभारी एसडीपीओ बागबान यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, संदीप चव्हाण, ठाणेदार विजय चव्हाण, पीएसआय जायभाये, खामकर, गीते, चव्हाण यांनी केली.

 
असे जुळले कनेक्शन

ढाणकी येथील विकास परिमल व चंद्रकांत सावते या दोघांचा जेसीबीचा व्यवसाय आहे. जिल्हावार यांच्या शेतात सोने असल्याची माहिती परिमल यानेच चंद्रकांतला दिली. त्यानुसार साथीदारांची जुळवाजुळवा केली. अशा प्रकारे या प्रकरणात विदर्भ-मराठवाडा कनेक्शन जुळून आले.
 
 
दोन महिन्यांपासून पाळत 

शेतात सोने असल्याची माहिती परिमल याने दोन महिन्यांपूर्वीच चंद्रकांत याला दिली होती. तेव्हापासून चंद्रकांत जिल्हावार यांच्या गोठ्यावर पाळत ठेवून होता. त्याने नांदेड जिल्ह्यातील पवना, भोकर, उमरी या गावांतील साथीदारांची जुळवाजुळव केली. त्यांनी कडब्याची सुडी उकलून धनाचा शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery for three boxes of gold, ten accused arrested