esakal | व्यसनमुक्‍त समाजनिर्मितीचा उचलला विडा
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णाला तपासताना रोहित गणोरकर.

व्यसनमुक्‍त समाजनिर्मितीचा उचलला विडा

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर  : सायंकाळ होत आली की त्यांच्या हृदयाची धडधड वाढते...आपली कच्चीबच्ची घेऊन त्या घरात बंदिस्त होतात...भांडणाला आज काय नवीन कारण, या विचाराने त्यांचे अंग घामाघूम होते...रात्र झाली की बहुतांश घरातून भांडणाचे, रडण्याचे आवाज...हे ऐकले की अंगावर अक्षरश: काटा उभा राहायचा...कर्ता पुरुष दारुडा असलेल्या घरातील हा दररोजचा किस्सा...हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे असे मनाशी ठरविले. कारण दारूचे व्यसन हासुद्धा एक आजार आहे, जो बरा होऊ शकतो, असा ठाम विश्‍वास होता. त्यातूनच व्यसनमुक्‍त समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. ज्याला आज उत्तम यश मिळाले असून, संपूर्ण दारूमुक्‍ती हेच ध्येय असल्याचे रोहित गणोरकर गर्वाने सांगतो.
अमरावती जिल्ह्यातील करजगावचा असलेल्या रोहितला बालपणापासून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपल्या वैयक्‍तिक आयुष्यासोबतच समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना रोहितच्या मनात समज येताच निर्माण झाली. डॉक्‍टरकीची पदवी मिळवून 50 वर्षांत एकही डॉक्‍टर न झालेल्या आपल्या गावातील लोकांची सेवा करायची, असे त्याने मनाशी ठरवले. त्या दिशेने वाटचाल करीत त्याने नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्‍टरीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो 2014 मध्ये डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या "सर्च'मध्ये दाखल झाला. येथेच आपण खऱ्या अर्थाने घडलो, असे रोहित सांगतो.
चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा अक्षरश: महापूर वाहतो. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि सर्चच्या "मुक्‍तिपथ'अंतर्गत गावपातळीवर व्यसनमुक्‍ती शिबिरांचे आयोजन केले जाते. यातून व्यसनी रुग्णांचे समुपदेश, त्यांच्यावर उपचार आणि त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाते. व्यसनी लोकांचे गट पाडून त्यांच्यावर उपचार करणे सुरू केले.व्यसनाधीन झालेल्यांचे चार गट करून त्यांचे समुपदेशन, उपचार आणि त्यांचे निरीक्षण करून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे दिशेने वाट्टेल ते रोहित आणि त्याचे सहकारी करायचे. सततच्या उपचारातून बऱ्याच लोकांची दारू सुटल्याचे त्याने सांगितले.
आपण जे ठरवतो ते नक्‍कीच करू शकतो. केवळ त्यादिशेने वाटचाल गरजेची आहे. दारूमुक्‍तीसाठी राजकीय पातळीवर, कायद्याच्या दृष्टीने बदल करणे गरजेचे आहे. दारूबंदीतून दारूमुक्तीकडे वाटचाल असणे गरजेचे आहे.
रोहित गणोरकर, सदस्य निर्माण संस्था, सर्च फाउंडेशन

loading image
go to top