अरेच्चा! विदर्भाची ही मुलगी ‘केसरी’ चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत

rupa.jpg
rupa.jpg

मलकापूर (जि.बुलडाणा) : चित्रपटसृष्टी म्हटलं की झगमगाट, मायानगरी असेच काहीसे चित्र सर्वांसमोर उभे ठाकते. अशा या मायानगरीत करीअर करण्याची धडपड अनेकांकडून केली जाते. मात्र, या मायानगरीत प्रत्येकालाच संधी मिळेल व त्या संधीचे सोने करता येईल असे फारच कमी असतात. त्यामुळे इच्छा असतांनाही बऱ्याचदा या खडतर अशा प्रवासाकडे दुर्लक्षच केल्या जाते. परंतु चित्रपटसृष्टीत आपणाला करिअर करायचे अशा दृढ इच्छाशक्तीची गाठ मनाशी बांधून मुळ मलकापूर येथील रहिवाशी असलेल्या रुपा संतोष बोरगावकर यांची मुख्य नायिकेची भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘केसरी’ येत्या 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या उत्तुंग भरारीमुळे विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर नगरीची मान विविध क्षेत्राबरोबरच आता मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट सृष्टीतही निश्चितच उंचावली आहे.


राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके व संतोष रामचंदानी निर्मित ‘केसरी’ हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुजयने एक नवीन नायक विराट मॅडके याची ओळख करून दिली. तर या चित्रपटात मुख्य नायीकेच्या भूमिकेत रूपा बोरगावकर ही आहे. हा चित्रपट कुस्ती खेळाच्या पाश्र्वभूमीवर तयार करण्यात आला असून प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या गरीब कुटुंबातील एका तरुणाभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. यामध्ये विराट मदाके आणि रुपा बोरगावकर यांची प्रमुख भूमिका आहे. यांचे सोबत महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, उमेश जाधव यांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

यामध्ये महेश मांजरेकर यांनी प्रशिक्षकाची भूमिका साकारली असून चित्रपटामध्ये रुपा बोरगावकर ह्या मदाके यांची आवड असून, त्यांनी त्यांच्या ध्येयासाठी नेहमीच समर्थ अशी साथ त्यांना दिलेली आहे. कुस्ती स्पर्धा जिंकण्यासाठी चित्रपटातील हिरोला रुपा बोरगावकर ह्या नेहमीच विविध प्रकारे प्रोत्साहन देवून त्यांना ही कुस्ती स्पर्धा जिंकण्यासाठी सहकार्याच्याच भूमिकेत दाखविण्यात आल्या आहेत. मुळ मलकापूर येथील रहिवासी असलेली रुपा बोरगावकर ह्या येथील प्रसिध्द उद्योजक चैतन्य केमीकलचे संतोष बोरगावकर यांची कन्या असून, लहानपणापासून तिला ‘अभिनय’ या क्षेत्रामध्ये आवड होती.

स्कॉलरशिप सुध्दा मिळाली 
तिने आपले प्राथमिक शिक्षण नॅशनल कॉन्व्हेंटमधून पूर्ण केल्यानंतर 12 वी पर्यंतचे शिक्षण हे मधुभाऊ सावजी इंग्लीश स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने पुणे येथे जावून त्याठिकाणी लॉ (वकीली)चे शिक्षणाबरोबरच तिला आवड असलेल्या ‘अ‍ॅक्टीग’च्या क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रीत केले. त्यादृष्टीने तिने पुणे येथील फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हीजन इन्स्टीट्यूट इंडीयामध्ये घेण्यात येणाऱ्या चाचणीमध्ये सर्वोत्कृष्ट येण्याचा बहुमान पटकाविला होता. त्यामुळे तिला जया भादुरी यांच्या नावाने देण्यात येणारी स्कॉलरशिप सुध्दा मिळाली होती. त्यानंतर तिने त्याठिकाणी आवश्यक असलेले सर्व शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात करिअरच्या संधी तिला चालून आल्या.

रेवा चित्रपटाबद्दल गुजरात सरकारकडून पुरस्कार
रुपा बोरगावकर हिने ‘केसरी’ या मराठी चित्रपटात नायीकेची मुख्य भूमिका करण्यापूर्वी 2014 मध्ये अ ड्रिम अ‍ॅनिमल, 2016 कुला, 2017 वेदर रिपोर्ट अशा लहान-मोठ्या चित्रपट व मालिकांमधून आपली भूमिका साकारली होती. तर 2018 मध्ये गुजरातीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेवा’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटाला जवळपास पाच पुरस्कार मिळाले होते. तर रुपा बोरगावकर यांना बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. तर याच रेवा चित्रपटाबद्दल तिला नुकताच गुजरात सरकारकडून तिला प्रतिष्ठेचा समजला जाणार पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, एक लाख रुपये, मानचिन्ह असलेला हा पुरस्कार येत्या काही दिवसांत वितरीत केल्या जाणार आहे. तर नावाजलेल्या एका चॉकलेटमधील तिची भूमिका सर्वांनाच भावून गेली आहे. अशा अनेक छोट्या-मोठ्या जाहिराती लघू चित्रपट व चित्रपटामध्ये आजपर्यंत रुपा बोरगावकर हिने विविध रोल साकारले असून, येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘केसरी’ या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिची भूमिका ही निश्चितच सर्वांना आवडेल व ती आपल्या मलकापूर शहरासह संपूर्ण विदर्भाचे नाव देशपातळीवर पोहचवेल यात दुमत नाही.

मनोधैर्य वाढवणारी पण तेवढीच जिगरबाज
महाराष्ट्रातील लाल मातीची कुस्ती अनेक तरुणांना आकर्षित करते. त्यातही अपार कष्ट घेत तालमीत तयार होणारा प्रत्येक कुस्तीगीर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्याचे स्वप्न मनात बघतच असतो. अशाच एका गरीब घरातल्या तरुण मल्लाच्या जिद्दीची कथा सुजय डहाके दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘केसरी’मध्ये दाखविण्यात आली आहे. या मल्लाच्या जिद्दीला साथ देणारी आहे. गावातील आई शिवाय वाढलेली एका परिटाची मुलगी म्हणजे मूळ मलकापूरची राहणारी रुपा बोरगावकर.. हा एक मराठी चित्रपट सृष्टीचा लाभलेला नवा चेहरा. या तरुण पोराला सगळे गाव विरोध करत असतानाही स्वतः पुढे येऊन मार्गदर्शन करणारे वस्ताद रंगवलेत महेश मांजरेकर यांनी. याशिवाय या चित्रपटात मोहन जोशी, जयवंत वाडकर, प्रवीण तरडे, किशोर कदम यानी आपापल्या भूमिकांनी चित्रपट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे.
सुरुवातीला अपयश आल्याने आलेली निराशा व व त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवत त्याचे मनोधैर्य वाढवणारी गावातील अवखळ पण तेवढीच जिगरबाज अशा मुलीचा ठसका रूपा बोरगावकरने रंगतदार केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com