esakal | गावातल्या बायाईसाठी कुठलं व माय लॉकडाउन? आपलं त सारं आयुष्य घरातच जाते! 
sakal

बोलून बातमी शोधा

gruhudyog

घरोघरी चार भिंतीच्या आत राहून फावल्या वेळेचा सदुपयोग करीत मूगवड्या, शेवया, विविध प्रकारचे पापड इत्यादी खाद्यपदार्थ घरबसल्या सुरक्षित अंतर राखून घरातील महिला वर्ग बनवित आहेत.

गावातल्या बायाईसाठी कुठलं व माय लॉकडाउन? आपलं त सारं आयुष्य घरातच जाते! 

sakal_logo
By
शुभम शहारे

चिखली (जि. गोंदिया) : जुने ते सोने या उक्तीप्रमाणे आजही विज्ञानाच्या तथा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा मोठ्या आपुलकीने व उत्साहाने जपल्या जातात. त्याची प्रचिती कोविड-19 या गंभीर साथीच्या काळातही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे घरीच राहण्याची संधी मिळाल्याने या संधीचा फायदा घेत ग्रामीण महिला आपल्या मुलींना सोबत घेत कुरोड्या, पापड, मूगवड्या, शेवया इत्यादी वर्षभर उपयोगी पडणारे खाद्यपदार्थ तयार करण्यात व्यस्त आहेत. हे पदार्थ बनविता बनविता त्या आपसात बोलतात... ""गावातल्या बायाईसाठी कुठलं व माय लॉकडाउन? आपलं त सारं आयुष्य घरातच जाते!'' 

सध्या संपूर्ण जग कोरोना नावाच्या महाभयंकर विषाणूने त्रस्त आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून जनतेचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी कायदा लागू केला. तसेच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आता घरोघरी चार भिंतीच्या आत राहून फावल्या वेळेचा सदुपयोग करीत मूगवड्या, शेवया, विविध प्रकारचे पापड इत्यादी खाद्यपदार्थ घरबसल्या सुरक्षित अंतर राखून घरातील महिला वर्ग बनवित आहेत. घरातील सकाळचा स्वयंपाकपाणी आटोपल्यावर ग्रामीण महिला दुपारी निवांतपणे वर्षभर पुरविणारे हे पदार्थ बनविण्यात व्यस्त असतात आणि सोबतीला असते त्यांची ती ग्रामीण बोलीभाषा... 

अवश्य वाचा- तू सांग किती पैसे पाहिजे, फक्त माझी इच्छा पूर्ण कर...

सडक अर्जुनी तालुक्‍यातील चिखली गावातील महिला सुमारे एक महिन्यापासून तांदळाचे आणि गव्हाचे विविध खाद्यपदार्थ घरीच तयार करीत आहेत. वास्तविक पाहता संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सर्वांच्याच मनात फार मोठी दहशत निर्माण झाली आहे. असे असतानाही जराही न डगमगता, न घाबरता ग्रामीण महिला घरच्या घरी बसून लॉकडाउनच्या काळात वेळेचा दुरुपयोग करीत आहेत. संपूर्ण देशात कामकाज ठप्प पडले असतानाही ग्रामीण महिलांनी आपला गृहउद्योग सुरूच ठेवला आहे. ग्रामीण भागातील अशा कृतिशील महिलांना शासनाकडून रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही, हेच या महिलांनी जणू दाखवून दिले आहे.