साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे "फ्लॉवरपॉट'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नागपूर : "साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे एखाद्या "फ्लॉवरपॉट'प्रमाणे असतो. तो सतत आपला फिरत असतो, इकडून तिकडे. त्याला काम करण्यासाठी अधिकार मिळाले पाहिजे,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केले. यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार आधार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूकऐवजी निवड, या पद्धतीचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, "इंदिरा संतांना पराभूत करून रमेश मंत्री संमेलनाध्यक्ष झाले होते, ही बाब आश्‍चर्यचकित करणारी होती. त्यात नंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीबद्दल अनेक वर्षे जे ऐकतोय ते अद्‌भुतच आहे. या पार्श्‍वभूमीवर पंधरा माणसं एकमताने अरुणा ढेरे यांची सन्मानाने अध्यक्षपदासाठी निवड करतात, ही तर संमेलनाच्या राजकारणातील क्रांतीच आहे.' प्रा. एलकुंचवार यांना संमेलनाचा उल्लेख करताना नाव आठवलं नाही. व्यासपीठावरील पाहुण्यांकडे वळून त्यांनी "कुठलं नाव?' असे विचारले आणि पुढे बोलू लागले. "मला गर्दी सोसवत नाही म्हणून मी संमेलनाला जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. पण, माझा विरोध नाही आणि निषेधही नाही. तो एक उत्सव असतो. लोक त्याला मानाची जागा मानतात. अशा मानाच्या पदावर अरुणाची निवड व्हावी, याचा आनंद आहे. अतिशय योग्य व्यक्तीची निवड असल्याचे मी मानतो,' असे प्रा. एलकुंचवार म्हणाले.
"संमेलनावरील खर्च अवाढव्य'
"शेतकरी आत्महत्यांसारख्या विषयांचे दाखले देऊन परवा एकाने संमेलनावर होणाऱ्या खर्चाला विरोध केला. मलाही हा खर्च अवाढव्य वाटतो. लेखकांनी स्वतःच्या खर्चाने जायला हवे. लाख-लाख रुपयांचे सरकारी पुरस्कार मिळतातच अनेक लेखकांना. ते स्वतःही खर्च करून जाऊ शकतात,' या शब्दांत प्रा. एलकुंचवार यांनी कानपिचक्‍या घेतल्या.
"लेखक जगविण्यासाठी एकत्र या'
आजारी किंवा हलाखीत जगणाऱ्या लेखकांसाठी निधी जमा करण्यासाठी एकत्र आलो तर योग्य होईल. साहित्यावर चर्चा नेहमीच होतात. यानिमित्ताने वर्षाला काही दहा-पंधरा लेखकांना मदत करता येईल. ही मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांचीच आहे. संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिक कमी आणि मंत्री, पुढारीच अधिक असतात. त्यामुळे अरुणाने हा विषय मांडायला हरकत नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sahitya sammelan news