वणीचे माजी नगराध्यक्ष संजय देरकरांनी बांधलं शिवबंधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Sajay Derkar enter in shivsena in presence of CM Udhhav Thackeray in Yavatmal
Sajay Derkar enter in shivsena in presence of CM Udhhav Thackeray in Yavatmal

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व वणीचे माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांनी आज, बुधवारी (ता. सहा) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी साडेबारादरम्यान मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी दिली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची; तर उपाध्यक्षपदी शिवसेनेतर्फे संजय देरकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष कोंगरे व उपाध्यक्ष देरकर हे दोघेही वणी तालुक्याचे असल्याने शेतकर्‍यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार वणीच्या प्रभावाखाली गेला, अशी चर्चा सुरू झाली होती. तर, यावर काँग्रेसचे चंद्रपूर-आर्णीचे खासदार बाळू धानोरकर यांचा वरचष्मा असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. 

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच संजय देरकर हे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज मुंबईत वर्षा निवासस्थानी संजय देरकर यांचा शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षबळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 

महाविकास आघाडीने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर, पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार, संजय देरकर यांचे समर्थक वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, लतीफ खान, लोकेश्‍वर बोबडे, विठ्ठल बोंडे, सरपंच शिंदोला, राजू लडके, रिझवान खान, प्रीतम बोबडे, सुशील मुथा आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी दिले वणी भेटीचे आश्‍वासन

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वणीच्या भेटीवर लवकरच येणार असल्याचे सांगितले. त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी शेतकरी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना व पक्षाचे काम पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

’वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामपंचायत निवडणूक, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल. संघटन मजबूत करून सामाजिक कार्याचा वेग वाढविणार आहे. ग्रामीण जनतेच्या, शेतकर्‍यांच्या समस्या पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याला प्राधान्य राहील.
-संजय देरकर,
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com