देशात पहिल्यांदाच घडली घटना, बालकांना सॅनिटाझर पाजलेच कसे? डॉक्टरांनाही पडला प्रश्न

sanitizer dose give to children is the first incident of country
sanitizer dose give to children is the first incident of country

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत २४ तासांच्या आत जनसमुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडीसेविका, आशावर्कर या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवेततून बडतर्फ केले आहे. तर, दोन वैद्यकीय अधिकार्‍यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची पहिलीच घटना राज्यासह देशात असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.

जनसमुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गावंडे, आशावर्कर संगीता मसराम, अंगणवाडीसेविका यांच्यावर बडतर्फतेची कुर्‍हाड कोसळली आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधीकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावजण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी (ता.31) लसीकरणानंतर 12 लहान बालकांना सुरुवातीला मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू  झाला. पोलिओचा डोस सोडून सॅनिटायझर पाजल्याचे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. तत्काळ बालकांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले. 

एक ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान सीईओ डॉ. पांचाळ यांना आरोग्य व महिला व बालकल्याण विभागाकडून अहवाल प्राप्त होताच दोन आरोग्य विभागाचे व महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांची सेवाच समाप्त केली. पोलिओ लसीकरणादरम्यान बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आलेच कसे, असा प्रश्‍न जनसामान्यांसह डॉक्टरांना पडला आहे. तर, हा संपूर्ण प्रकार समजण्यापलिकडे असल्याची प्रतिक्रीया अधिकारी वर्गातून ऐकायला मिळत आहे.

पोलिओ लसीकरणादरम्यान बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर येताच २४ तासांत अहवाल मागण्यात आला. कर्मचार्‍यांना पंधरा दिवसांपूर्वीच प्रशिक्षणही दिले होते. त्याचीही चौकशी करण्यात आली. आरोग्य विभागाचे सीएचओ व आशा वर्कर, तर महिला व बालकल्याण विभागाकडून आलेल्या अहवालानुसार अंगणवाडीसेविका अशा तिन कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले.
- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ, जिल्हा परिषद, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com