
मध्यमवर्गीय कुटुंबातील सुबोध नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. लॉकडाउनमुळे कॉलेज बंद असल्याने तो गावी परत आला. या सुटीच्या दिवसांचा त्याने मशीन वनविण्यात उपयोग केला. सार्वजनिक ठिकाणी वारंवार स्पर्श झाल्याने कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे स्पर्श विरहित सॅनिटायझर मशीन बनवण्याची कल्पना त्याला सुचली.
वरठी (जि. भंडारा) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या लाटेतून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वदेशीचा वापर, स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. याच त्रिसूत्रीचे अनुसरण करीत सातोना (ता. मोहाडी) येथील सुबोध गजभिये या अभियांत्रिकीच्या होतकरू विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून फक्त 800 रुपयांत स्पर्श न करता वापरता येणारे सॅनिटायझर यंत्र तयार केले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडले आहे. एकमेकांचा संपर्क व स्पर्श टाळण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण होत असले; तरी त्याचा वापर करण्यासाठी प्रत्यक्ष स्पर्श होतोच. सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयात यंत्राला अनेकांचे हात लागतात. अशावेळी शक्कल लढवून सुबोधने या यंत्राचा जुगाड केला.
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी त्याचे हे संशोधन उपयुक्त ठरत आहे. सुबोध मुकेश गजभिये हा वरठी नजीकच्या सातोनाचा रहिवासी आहे. वडील खासगी पतसंस्थेत नोकरीवर तर आई गृहिणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील सुबोध नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. लॉकडाउनमुळे कॉलेज बंद असल्याने तो गावी परत आला. या सुटीच्या दिवसांचा त्याने मशीन वनविण्यात उपयोग केला. सार्वजनिक ठिकाणी वारंवार स्पर्श झाल्याने कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे स्पर्श विरहित सॅनिटायझर मशीन बनवण्याची कल्पना त्याला सुचली.
सुबोधने घरातील उपलब्ध असलेल्या कार्डबोर्डचे डिझाईन बनवले. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मशीन बसवली. ही मशीन इलेक्ट्रिक किंवा बॅटरी या दोन्ही उपकरणावर चालते. मशीनच्या खाली हात ठेवल्यावर त्यातून सॅनिटायझर येते. त्यामुळे मशीनला कुठेच स्पर्श होत नाही. हे यंत्र बनविण्यासाठी त्याला फक्त 800 रुपये खर्च आला. बाजारातही अशी यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र, त्याची किंमत सुबोधने बनविलेल्या मशीनच्या तुलनेत चौपट आहे. भारतीय बनावटीचे अगदी स्वस्त आणि सहज हाताळता येणारे हे यंत्र सुबोधने वरठी पोलिस ठाण्यात भेट दिले.
हेही वाचा : साकोली-लाखनीत पोलिसांचा रूटमार्च नेमका कशासाठी?
कोरोना विरुद्धच्या लढ्यात पोलिस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पोलिसांचा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शेकडो लोकांशी संपर्क येतो. यात पोलिस सुरक्षित राहावे म्हणून त्याने आपले यंत्र पोलिस ठाण्याला भेट दिले. त्याच्या या प्रयोगाने पोलिस कर्मचारी भारावून गेले. स्पर्श न करता पोलिस सॅनिटाईज यंत्राचा वापर करीत असून त्यांनी याबद्दल सुुबोधचे कौतुक करीत आभार मानले आहे.