कुपोषित बालकांसाठी संजीवनी पोषण अभियान, आरोग्य कार्डसह पोषण आहाराचे करणार वाटप

टीम ई सकाळ
Monday, 19 October 2020

एकूण ९१ कुपोषित बालकांना मोफत आहार किट व आरोग्य कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी समाजसेवक आरोग्यदूत डॉ. कुलभूषण मोरे यांच्या अर्थ ग्रामीण आरोग्य व संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

जिवती (जि. चंद्रपूर)- जिल्ह्यातील अतिदुर्गम बहुल जिवती तालुका कुपोषणमुक्त व्हावा, यासाठी मिशन संजीवनी पोषण अभियान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत २६ तीव्र कुपोषित आणि ६५ मध्यम, असे एकूण ९१ कुपोषित बालकांना मोफत आहार किट व आरोग्य कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी समाजसेवक आरोग्यदूत डॉ. कुलभूषण मोरे यांच्या अर्थ ग्रामीण आरोग्य व संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

महाराष्ट्रतील सर्वात  अविकसित व अतिदुर्गम तालुक्यामधे  जिवती तालुका येतो. त्यामुळे अनेक गावात पायाभूत सुविधा पोहोचल्या नसल्याने इथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. कुपोषित बालक दगावू नये यासाठी अर्थ फाउंडेशनचे  संचालक व समाजसेवक डॉ. कुलभूषण मोरे, सल्लागार  सदस्य  प्रा. किरणकुमार मनुरे, मार्गदर्शक प्रा. डॉ. राजकुमार मुसने  यांनी हा उपक्रम सुरू केला. या मिशन संजीवनी पोषण आहार उपक्रमाची माहिती समाज माध्यमावर मिळताच अनेक देश विदेशातून या उपक्रमासाठी मदतीचे हात समोर आले आहेत. 

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

तालुक्यातील सामाजिक तसेच नामवंत दानशूर व्यक्ती या मिशन संजीवनी पोषण अभियानास आर्थिक मदत करत आहेत. आपला वाढदिवस, एखादा सणउत्सव, लग्न समारंभ याचे औचित्य साधून आपणही या कुपोषण मुक्तीचा लढ्यात सामील व्हावे व मदत करावी, असे आवाहन अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉ. कुलभूषण मोरे यांनी केले आहे.  अशाप्रकारे लोक सहभागातून निधी गोळा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थ फाउंडेशन जिवती तालुक्यात आरोग्य शिबीर, जनजागृती कार्यक्रम, सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प राबवत आहे. सोबतच दरवर्षी कुपोषित बालकांचे आरोग्य व उपचार शिबीर आयोजित करून शेकडो बालकांचे  कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदा तालुका बालविकास अधिकारी  गारुळे यांच्याकडून कुपोषित बालकांची यादी काढण्यात आली. त्यानंतर अर्थ संस्थेकडून प्रत्येक कुपोषित बालकांची अंगणवाडी केंद्र व गृह भेट देऊन पाहणी केली गेली. डॉ. मोरे यांना या अभ्यासात जिवती तालुक्यातील कुपोषित बालके मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून  आले. 

जवळपास जिवती तालुक्यातील गावातील 26 तिव्र कुपोषित  व 65  मध्यम कुपोषित, असे एकूण 91 कुपोषित बालकांना मोफत आहार देऊन किट वाटप करण्यात येणार आहे. त्यांना आरोग्य कार्डचे  वाटप करण्यात येणार आहे . या आहार पोषण  किटमध्ये हरभरा, मूग, वटाणे, बरबटी, गूळ, शेंगदाणे, अंडे, मोट इत्यादीचा समावेश केला आहे . बालकांची उंची, वजन , दंडघेर  आदींची माहिती घेण्यात आली असून 3 महिन्याचा आहार दिल्यानंतर बालकांमधे झालेले बदल समजून घेण्यासाठी परत तपासणी केली जाणार आहे यासाठी गडचांदूर येथील डॉ. कुलभूषण मोरे हे स्वतः सहा वर्षापर्यंतच्या सर्व कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत.  या अभियानासाठी अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉ. कुलभूषण मोरे, सल्लागार सदस्य प्रा. किरणकुमार मनुरे, सल्लागार मार्गदर्शक प्रा. डॉ. राजकुमार मुसने, कोर्डिनेटर गणेश ढगे, आरोग्यदूत सनी गाजर्लावार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हेही वाचा - श्‍वास रोखून सुरेशने काढले पुरात विहिरीत बुडालेले...

कुपोषण मुक्तीसाठी अर्थचे आरोग्यदूत सज्ज आहेत. पोषण आहार वाटप केलेल्या बालकांमधे काय बदल घडून आले? याची माहिती घेण्यासाठी अर्थ फाउंडेशनने आरोग्य दूत नेमले आहेत. त्यामुळे विशेष मदत व माहिती मिळणार आहे.
  -  डॉ कुलभुषण मोरे

मिशन संजीवनी पोषण अभियानास कॅनडामधून मदत -
अर्थ फाउंडेशनचे कुपोषण मुक्ती अभियान हे लोकसहभागतून सुरू असून या उपक्रमाला प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीकांत दलाल यांनी मेडिकल युनिव्हर्सिटी कॅनडा येथून स्वतः मदत केली आहे. तसेच जिवती तालुक्यातील कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाने मदतीचे हात समोर केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjivani poshan abhiyan for malnourished child in jivati of chandrapur