आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी बनवली योजना परंतु नंतर वाजले बारा....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पावलेल्या व आत्महत्या करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यावर्षी कन्यादान योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींच्या लग्नासाठी 21 हजार रुपयांची मदत देण्यात येईल. परंतु सदर योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केवळ 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अकोला : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पावलेल्या व आत्महत्या करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यावर्षी कन्यादान योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींच्या लग्नासाठी 21 हजार रुपयांची मदत देण्यात येईल. परंतु सदर योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केवळ 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे खर्चाला न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून अकोला जिल्ह्याची विदर्भात ओळख झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी 21 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या योजनेवर अर्थसंकल्पात एक हजार रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. 

पुर्ननियोजनाचा पर्याय उपलब्ध
कन्यादान योजनेसाठी अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जादा निधी हवा असल्यास पुर्ननियोजनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सदर योजना सत्ताधाऱ्यांना राबवायची असल्यास यापुढे होणाऱ्या सभेत सदर योजनेवर निधीचे पुर्ननियोजनच सत्ताधाऱ्यांना करावे लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scheme for suicide farmer family run by zilha parishad akola