शाळांचा प्रायोगिकतत्त्वावर विकास करणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सरकारी शाळांचा विकास हा माझा व सरकारचा प्राथमिक अजेंडा असेल. प्रायोगिकतत्त्वावर त्याची सुरुवात दत्तक गाव राजापूर खिनखिन येथून करणार आहे. यापुढे जिल्ह्यातील एकही प्रकल्प निधी अभावी थांबणार नाही, याची मी हमी घेतो, असे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (ता.15) सकाळ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत आश्‍वस्त केले.

अकोला : सरकारी शाळांचा विकास हा माझा व सरकारचा प्राथमिक अजेंडा असेल. प्रायोगिकतत्त्वावर त्याची सुरुवात दत्तक गाव राजापूर खिनखिन येथून करणार आहे. यापुढे जिल्ह्यातील एकही प्रकल्प निधी अभावी थांबणार नाही, याची मी हमी घेतो, असे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी (ता.15) सकाळ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत आश्‍वस्त केले.

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर बच्चू कडू यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यानंतर प्रथमच ते अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बुधवारी सायंकाळी सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या अकोला कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीचे निवासी संपादक संदीप भारंबे यांनी स्वागत केले. त्यानंतर संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत पालकमंत्री कडू यांनी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. आरोग्य सेवक म्हणून काम केले असल्याने आरोग्याच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा शिस्त लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाच्या बाबतीत सरकार शाळांची स्थिती सुधारणे हा शिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून माझा व सरकारचा प्राथमिक अजेंडा असेल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीप्रमाणे शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रायोगिकतत्त्वावर राजापूर खिनखिनी येथील शाळेचा विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘सेवा हमी’ची पहिली फाईल अकोल्यात
सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नाही. यापुढे कुणाचेही काम थांबणार नाही. सेवा हमी कायद्यानुसार पहिली फाईल अकोल्यात तयार होईल. त्यावर फाईल तयार झाल्यापासून ते मंजूर होईपर्यंत प्रत्येक टप्प्‍यात कुठे कधी काम झाले याची नोंद असेल. त्यातून सेवेची हमी दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधी
जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत विचारणा केली असता एकही प्रकल्प निधी अभावी रखडणार नाही याचे नियोजन करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नरनाराळ महोत्सवाबाबत विचार करू
अकोला जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या नरनराळा किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी नरनाराळा महोत्सव पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

आक्रमक बच्चू कडू ते राज्यमंत्री
एक आक्रमक आमदार बच्चू कडू आणि राज्यमंत्री म्हणून काम करताना कोणता फरक जाणवला असे विचारले असता पालकमंत्री बच्चू कडू यांनी कोणताही फरक जाणवत नसल्याचे सांगितले. काम करण्याची आक्रमकता कायम राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school development from bacchu kadu at akola