esakal | `या` गावातील शाळा होणार बुधवारपासून सुरू; आपत्कालीन समितीने घेतला निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

Khodshiwani sabha

बुधवार, एक जुलैपासून इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. नियमानुसार एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल असे ठरविण्यात आले. 

`या` गावातील शाळा होणार बुधवारपासून सुरू; आपत्कालीन समितीने घेतला निर्णय 

sakal_logo
By
आर. व्ही. मेश्राम

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : खोडशिवनी येथील आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या वतीने शाहू महाराज जयंतीनिमित्त शाळा सुरू करण्याबाबतची सभा शामसुंदर बोरकर हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात आली. त्यामध्ये कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपाययोजना करून एक जुलैपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. 

खोडशिवनी येथे दोन प्राथमिक शाळा, एक हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे. इयत्ता नववी, दहावी व बारावी हे वर्ग मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्गातील मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापन समिती, शाळा सुधार समिती व शिक्षकांची सभा घेण्यात आली. त्यामध्ये बुधवार, एक जुलैपासून इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. नियमानुसार एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल असे ठरविण्यात आले. 

त्यापूर्वी सर्व शाळांचे ग्रामपंचायततर्फे निर्जंतुकीकरण करणे, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवणे, साबणाने हात धुऊन शाळेत प्रवेश करणे, सर्व विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक करणे, कोणत्याही व्यक्तीला परवानगीशिवाय शाळेत प्रवेश न करू देणे, सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी आरोग्य केंद्राकडून करून घेणे, कंटोनमेंट झोनमधून येणारे विद्यार्थी व शिक्षकांना प्रवेश बंदी करणे, शाळेत गर्दी करण्यावर व इतरत्र थुंकण्यावर बंदी घालणे इत्यादी नियम ठरवून व कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

अवश्य वाचा- पतीला सोडून प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि उघडकीस आली ही घटना....

सभेला सरपंच उर्मिला कंगाले, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, पंचायत समिती सदस्य इंदू परशुरामकर, उपसरपंच टेकराम परशुरामकर, मुख्याध्यापक ए.बी. मुडे, एम.एस. अंबादे, एम.जी. लंजे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष सुरेश बावणे, कैलास नेवारे, ग्यानिराम बन्सोड, पंचायत समिती सदस्य डॉ. आर.बी. वाढई, अनिल बावणे, राहुल वन्जारी, वनिता हाडगे, योगिता परशुरामकर, ममता नागपुरे, एम.जे. मस्के आदी उपस्थित होते. 

प्राथमिक शाळेचा निर्णय अद्याप नाही 

यावेळी समिती सचिव भृंगराज परशुरामकर यांनी सांगितले की, प्राथमिक शाळा सुरू करण्यासंबंधी समिती जुलै महिन्यात सभा घेऊन निर्णय घेईल. तोपर्यंत त्या बंदच राहतील. 

loading image