काय? गडचिरोलीत ऑगस्ट महिन्यात किलबिलाट...पालकमंत्र्यांनी दिले संकेत

मिलिंद उमरे
Sunday, 19 July 2020

गडचिरोलीत शाळा सुरू होण्याबाबत पालकमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात मुलांची किलबिलाट शाळेत ऐकू येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

गडचिरोली : राज्यासह जिल्ह्यातील शाळा येत्या 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटाइझ करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व शाळांना मास्क, सॅनिटायझर, अशा आवश्‍यक वस्तू पुरविण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत उपविभागीय समितीस प्राप्त दाव्यांचा निपटारा तातडीने करा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

 

शुक्रवारी (ता. 16) येथे आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, तीनही विधानसभा मतदार संघाचे आमदार, उपविभागीय अधिकारी, वनविभागाचे उपवनसंरक्षक उपस्थित होते.

 

या बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, उपविभागीय स्तरावर 43 हजार 685 वैयक्तिक दावे प्राप्त झाले आहेत. पैकी जिल्हास्तरावर 31 हजार 415 दावे मंजूर करण्यात आले आहेत. सामूहिक दाव्यांमध्ये उपविभागीय समितीस 1 हजार 791 दावे प्राप्त असून जिल्हास्तरावर त्यापैकी 1 हजार 397 दावे मान्य केले आहेत. उर्वरित दावे येत्या 30 दिवसांत त्रुटी दूर करून मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी समन्वय बैठकीत दिल्या.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

अधीक्षक अभियंता यांच्या कक्षेत येणाऱ्या विविध दुर्गम भागांतील रस्ते व पूल बांधकाम तसेच दुरुस्तीबाबत आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी वनविभागाकडील प्रलंबित कामाबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी वनविभागाला आवश्‍यक रस्ते व पूल यांच्याबाबत दुरुस्ती व निर्मितीकरिता मंजुरी देताना मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने कामे करा, अशा सूचना दिल्या.

क्लिक करा -  #Inspiring : गाई-म्हशी सांभाळून शेतकऱ्यांच्या लेकीची उत्तुंग भरारी

कोरोना नियंत्रणासाठी आणखी 5 कोटी देणार

जिल्ह्यातील कोरोना स्थिती प्रशासनाच्या मेहनतीने व जनतेच्या सहकार्याने नियंत्रणात आहे. आता जिल्ह्याबाहेरील सुरक्षा जवान व इतर नागरिकांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा 5 कोटी निधी येत्या आठ दिवसांत जिल्ह्याला प्राप्त होईल, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी या बैठकीत दिली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school will start on August 3 at gadchiroli