ब्रह्मपुरीच्या एसडीओ डोंबेंची तडकाफडकी बदली, शासन निर्णयाने उंचावल्या अनेकांच्या भुवया

प्रमोद काकडे
Monday, 12 October 2020

बल्लारपूर येथून दोन वर्षांपूर्वी क्रांती डोंबे यांची ब्रह्मपुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. मागील दोन वर्षांत डोंबे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तालुक्‍याचा कारभार सांभाळला.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची अवघ्या दोन वर्षांतच तडकाफडकी बदली करण्यात आली. 1 ऑक्‍टोबरला जारी केलेल्या राज्य शासनाच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. त्यामुळे या बदलीविरोधात डोंबे यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे मॅटचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, चांगले काम करत असताना अचानक बदली करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा - शाळा अद्यापही बंद, विद्यार्थिनी मुकणार उपस्थिती...

बल्लारपूर येथून दोन वर्षांपूर्वी क्रांती डोंबे यांची ब्रह्मपुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. मागील दोन वर्षांत डोंबे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तालुक्‍याचा कारभार सांभाळला. त्यांच्याच कार्यकाळात कोरोना, महापूर या गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांनी या सर्व समस्यांना अतिशय धीरगंभीरपणे तोंड दिले. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आलेल्या महापुरात वैनगंगा नदीकाठावरील अनेक गावांना चांगलाच फटका बसला. या काळात रात्रंदिवस एक करीत त्यांनी महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. उत्तम प्रशासक अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे तालुक्‍यात चांगला वचक निर्माण केला होता. 

हेही वाचा - अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; मंगळवारी...

तालुका, शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अगदी व्यवस्थित नियोजन केले होते. आजवरच्या कार्यकाळात त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे साधी तक्रारही करण्यात आली नाही. अशास्थितीत बदलीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. खुद्द डोंबे यांनी या बदलीविरोधात मॅटकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मॅटचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो यावर भविष्यातील ब्रह्मपुरीचा उपविभागीय अधिकारी कोण ठरणार हे निश्‍चित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sdo of brahmpuri dombe transfer to another place