पालकमंत्रीपद भूषविण्याची दुसऱ्यांदा यांना मिळाली संधी, वाचा...  

sanjay rathod.jpg
sanjay rathod.jpg
Updated on

यवतमाळ : शिवसेनेचे नेते, राज्याचे वने, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविण्याची ही दुसऱ्यांदा संधी लाभली आहे. यापूर्वी भाजप-शिवसेना महाआघाडी सरकारमध्ये ते यवतमाळ जिल्ह्याचे काहीकाळ पालकमंत्री होते. त्यानंतर सहपालकमंत्री झाले. पालकमंत्री असताना त्यांनी विविध कामे केली. यावेळी त्यांना पुन्हा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी मिळाल्याचे अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ताळ्यावर आणण्याची संधी मिळाली आहे. 

विकासाला चालना मिळेल

एका कर्तबगार नेत्याला पालकमंत्रीपद मिळाल्याने विकासाला चालना मिळेल, अशी जनतेला आशा आहे.भाजप-शिवसेना महाआघाडी सरकारमध्ये संजय राठोड महसूल राज्यमंत्री होते. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, भाजपने पक्षबांधणीच्या दृष्टीने पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढविला. त्यामुळे यवतमाळचे पालकमंत्री म्हणून भाजपचे आमदार व राज्याचे उर्जाराज्यमंत्री मदन येरावर यांची नियुक्ती झाली. तर, संजय राठोड यांना वाशीमचे पालकमंत्री करण्यात आले.

पालकमंत्रीपदावरून नेहमी संघर्ष

त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. खुद्द संजय राठोड यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. भाजप व शिवसेनेत पालकमंत्रीपदावरून नेहमी संघर्ष होत राहिला. राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याचे सहपालकमंत्री करून त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राठोड यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लुळबुळ न करता आपले सर्व लक्ष वाशीम जिल्ह्यावर केंद्रित केले. 

राजकारणाचे मूळ वाशीम

यवतमाळ व वाशीम हे जिल्हे लोकसभा मतदारसंघात अंतर्भूत आहेत. या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या खासदार भावना गवळी करतात. त्यांचे कार्यक्षेत्र वाशीम आहे. त्यांच्या राजकारणाचे मूळ वाशीम आहे. राठोड वाशीमचे पालकमंत्री झाल्यावर जिल्हाप्रमुखांच्या नेमणुकीवरून गवळी व राठोड यांच्यात मतभेद निर्माण झाले. हा वाद मातोश्रीपर्यत पोहोचला होता. त्यावर तोडगा निघाला नाही. उलट दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेत राठोड व गवळी असे दोन गट पडले. संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी दर्शविलेला विरोध हा त्याचाच एक भाग समजला जातो. पक्षांतर्गत मतभेद काही जरी असले तरी राठोड पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रकल्प त्यांना पूर्ण करावे लागणार 

अनेक अपूर्ण असलेले प्रकल्प त्यांना पूर्ण करावे लागणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी त्यांना पुन्हा बसवावी लागणार आहे. पंचायत समिती निवडणुकीत पडलेल्या ढिणगीचा वणवा होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या गृहविभागातही अनेक बदल करावे लागणार आहेत. त्यांच्यासमोर रखडलेली अमृत योजना, रोजगार निर्मितीसाठी नवे प्रकल्प, उद्योग उभारणे, बंद पडलेले उद्योग, सूतगिरणी व वसंत सारखा कारखाना सुरू करून विकासाची गती वाढविणे. सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडव्याव्या लागणार आहे. जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार करताना सर्वपक्षीय समन्वय ठेवावा लागणार आहे. तर, सर्व जिल्हा व तालुकास्तर समित्यांचे गठण करून स्थानिक नेतृत्वाला वाव मिळवून द्यावा लागणार आहे. सामान्य नागरिकांची कामे होतील, अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असली तरी जिल्ह्याच्या विकासाची मोठी अपेक्षा जनतेला आहे. 

कॉंग्रेसचा प्रयत्न फसला

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नितीन राऊत यांच्या रूपाने कॉंग्रेसला मिळावे, असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न होते. परंतु, यवतमाळचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे संजय राठोड यांना मिळाल्याने कॉंग्रेसचे प्रयत्न असफल झाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवाजीराव मोघे व एकदोन मंत्री सोडले तर पालकमंत्री म्हणून संजय राठोड यांनाच दुसऱ्यांदा जबाबदारी मिळाली आहे. पहिल्या सत्रातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com