
उमरखेड (जि. यवतमाळ) : कोरोना महामारीमुळे आधीच सुल्तानी संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्याला आता बियाणे कंपन्याही फसवू लागल्या आहेत. आता तर चक्क शेतात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांची दखल आमदार नामदेव ससाणेंसह कृषी अधिकाऱ्यांनी या शेतांची पाहणी केली.
खरिपात पडलेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. योग्य नियोजन व आर्थिक जुळवाजुळव करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. आतापर्यंत हजारो हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. परंतु तालुक्यातील तरोडा, पाऊनमारी, कृष्णापूर, मुळावा, वाणेगाव, टेंभुरदरा, जेवली, मथुरानगर, वरुडबिबी, ढाणकी, मरसूळ, नागेशवाडी, अकोली, दिघडी, हातला, चिंचोली (ढा), पार्डी (बं), तिवडी, मेट, बोरी येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेले हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.
या गावांतील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदविल्या असून तीन दिवसांपासून तक्रारींचा ढीग लागला आहे. ज्या कंपनीचे सोयाबीन उगवले नाही, अशा कंपनीची माहिती शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
उमरखेड तालुक्यातील एकूण किती शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नाही, याबाबत आकडेवारी कृषी विभाग काढत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी नाईक, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत शेताची पाहणी करीत आहेत. तसेच आमदार नामदेव ससाने यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांनी ज्या कंपनीचे बियाणे पेरले होते, ते बियाणे निकृष्ट होते की बोगस, याबाबत कृषी विभागाने तपासणी करणे गरजेचे झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व त्या बियाण्यांवर बंदी आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.