बचतगटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र जागा - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नागपूर - राज्यातील ३४ हजार गावांत तीन लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर - राज्यातील ३४ हजार गावांत तीन लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात रविवारी ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त अश्विन मुद्‌गल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार होते.

महिला बचतगटांच्या चळवळीत राज्यातील ३८ लाख कुटुंबे जुळली आहेत. या माध्यमातून मोठी व्यावसायिक साखळी निर्माण झाली आहे.

लोकसंख्येच्या ५० टक्के असलेल्या महिला शक्तीचा देशाच्या उत्पन्नात वाटा असल्याखेरीज देश पुढे जाणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रमुख भूमिका महिला करू शकतात. विकासाच्या वाटचालीमध्ये माता भगिनींना सहभागी केल्यास शाश्‍वत विकास होईल. पाच लाख कुटुंबाची उपजीविका चालवणारी बचतगटाची चळवळ पाचशे कोटींची उत्पादन क्षमता ठेवते. महिलांसाठींच्या वेगवेगळ्या योजनांना आतापर्यंत ४२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य दिले. महिला बचतगट कर्ज बुडवत नाहीत. किंबहुना वेळेच्या आधी कर्ज फेडतात, असा अनुभव असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वेबसाइटचे लोकार्पण करण्यात आले.

स्वयंसहायता बचतगटांचा सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उमेदअंतर्गत स्वयंसहायता समूहाच्या महिलांना उत्पादन वाढीसाठी सरकारच्या विविध योजनेअंतर्गत मंजूर निधी तसेच बॅंकेमार्फत मंजूर कर्ज रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात हार्दिक स्वयंसहायता महिला समूह, अन्नपूर्णा ग्राम संघ यवतमाळ, संघर्ष ग्राम संघ चंद्रपूर यांच्यासह सखी महिला स्वयंसहायता संघ, लक्ष्मी महिला स्वयंसहायता संघ, सरस्वती महिला बचत समूह सावंगी तसेच जयदुर्गा महिला स्वयंसहायता संघ रत्नापूर (वर्धा) आदींचा समावेश होता. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्यविकास  योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन विविध कंपनी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये नियुक्ती प्राप्त प्रणाली मेश्राम, तौफीक शेख, दीपक फुलमाळी यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. वर्ष २०१७-१८ या कालावधीत ‘उमेद’मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने तसेच कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मर्जीतल्या बचतगटांचीच नियुक्ती
नागपूर - महालक्ष्मी सरस प्रदर्शनात बचतगटांच्या निवडीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ऑनलाइन अर्ज मागविल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात बचतगटांना याची माहिती दिली नव्हती. मोजक्‍या व मर्जीतील बचतगटांकडून अर्ज भरून निवड केल्याची ओरड  होत आहे.

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन प्रथमच नागपुरात होत आहे. यासाठी देशभरातील १५० बचतगटांची निवड केली आहे.  प्रदर्शनासाठी जिल्ह्यातून १२ बचतगटांची निवड झाली आहे. ही निवड ऑनलाइन पद्धतीने झाल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र, यासाठी आवश्‍यक जनजागृती विभागाकडून करण्यात आली नाही.  आपल्याकडे ऑनलाइनची सुविधाच नाही. अर्ज कसा भरावा हेच माहिती नाही. त्यामुळे याचा आपल्याला काहीच फायदा झाला नाही, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी एक दुसरीला दिल्या. प्रदर्शनात लाखो, कोट्यवधींच्या मालाची विक्री होणार आहे. यासाठी तडतोड झाल्याची चर्चाही महिला करीत होत्या.

पंकजा मुंडेची अनुपस्थिती
नागपूर - महत्त्वाच्या कार्यक्रमाला खात्याचे मंत्री आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभाला मंत्री पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. महिला बचतगटाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.

पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा काही लपून राहिलेली नाही. दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या सावरगाव येथे त्यांनी आपण वाघीण असल्याचा हुंकार भरला होता. या भाषणातून त्यांनी अनेकांना इशारा दिल्याचे बोलले जात आहे. विभागाचा कार्यक्रम असतानाही मुख्यमंत्र्यांना मान दिल्याने त्या नाराज आहेत, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. कार्यक्रमाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच जाणार असल्याने त्यांनी येण्याचे टाळल्याचेही बोलले जात आहे. पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे  कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self help Group Goods Sailing Independent Place Devendra fadnavis