तुमसर येथील शहीद स्मारक आजही जपते आहे स्वातंत्र्यवीरांची स्मृती

गणेश बर्वे
Friday, 14 August 2020

१४ ऑगस्टला सकाळी गंज बाजारातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यात नेहमीपेक्षा अधिक लोक सहभागी झाले. सकाळी ११ वाजता संतप्त जमाव घोषणा देत पोलिस ठाण्याला आग लावण्यास आला. पोलिस त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, संतप्त नागरिक त्वेषाने पोलिस ठाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते.

तुमसर(जि. भंडारा) : जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्धचा असंतोष भारतीय जनमानसात सर्वदूर पसरला होता. म. गांधीजींच्या अहिंसेच्या झेंड्याखाली सारा देश एकवटला होता. विदर्भातील भंडारा जिल्हाही यामध्ये मागे नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तुमसर शहर हे जिल्ह्यातील मुख्य केंद्र बनले होते. शहरातील सहा क्रांतिकारकांनी १४ ऑगस्ट १९४२ ला प्राणांचे बलिदान दिले होते. इंग्रज सरकार विरोधी चळवळीत तुमसर शहराचे मोठे योगदान आहे. नंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही असंतोष पसरत गेला.

राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना, नगर परिषदेवर तिरंगा फडकविणे, प्रभात फेरी, इत्यादी सत्याग्रहात येथील स्वातंत्र्यवीर सहभागी झाले होते. येथे होणाऱ्या गुप्त बैठकांत शहरातील स्वातंत्र्य सैनिकांसोबत सिहोरा, करडी, मोहाडी परिसरातील अनेकांचा सहभाग होता. यातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जात होती.

नऊ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली. त्यांनी करा किंवा मरा असा संदेश दिला. पोलिसांनी तुमसर येथील प्रमुख नेत्यांना अटक केली. मात्र, १० ऑगस्टला रात्री बाबूजी लांजेवार यांच्या मालकीच्या अन्नपूर्णा राइस मिलमध्ये गुप्त बैठक घेण्यात आली. यावेळी ८० सदस्य उपस्थित होते. रात्री दोन वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत उपस्थितांनी आपल्या रक्ताने सही करून कोणत्याही परिस्थितीत पोलिस ठाणे व कचेरीवर तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली होती.

याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी भंडाऱ्याहून जादा कुमक मागविली होती. १३ ऑगस्टला सकाळपासून पोलिसांकडून शहरात धरपकड सुरू करण्यात आली. काही नेते भूमिगत झाले होते. पोलिसांनी घराच्या झडतीच्या नावावर लुटमार केली. त्यामुळे गावकऱ्यांत इंग्रजी सरकार व पोलिसांच्या विरोधात असंतोष वाढला. तिकडे भंडाऱ्याहून सैन्य पोहोचू नये म्हणून क्रांतिकारकांनी रस्ते खोदले, रस्त्यावर झाडे तोडून अडथळे निर्माण केले होते. वैनगंगेवरील रेल्वेचा पूल तोडणार असल्याची अफवा पसरल्याने भंडारा येथील स्पेशल मॅजिस्ट्रेट जयवंत एक दिवसाआधीच तुमसरला आले होते.

१४ ऑगस्टला सकाळी गंज बाजारातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यात नेहमीपेक्षा अधिक लोक सहभागी झाले. सकाळी ११ वाजता संतप्त जमाव घोषणा देत पोलिस ठाण्याला आग लावण्यास आला. पोलिस त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, संतप्त नागरिक त्वेषाने पोलिस ठाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. जमावाकडूनही पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. या गोंधळात ठाणेदार रवानी यांच्या ख्रिश्‍चन पत्नीने हातात पिस्तूल घेऊन जमावाला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी झाडलेली गोळी श्रीराम धुर्वे या किशोरवयीन मुलाच्या डोक्‍यात लागली व त्याने तेथेच प्राण सोडले. यामुळे जमाव प्रक्षोभित झाला.

जमाव पोलिस ठाण्यावर येत असताना पोलिसांनी गोळीबार सुरू केला. सोबतच मॅजिस्ट्रेट जयवंत याने स्वतः गोळीबार सुरू केला. यात भदूजी रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये करडी, पांडुरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे आणि राजाराम पैकू धुर्वे भंडारा यांचा मृत्यू झाला. जमावातील १३० लोक जखमी झाले होते. सात मिनिटांत घडलेल्या या घटनेमुळे तुमसर शहराचे नाव देशपातळीवर गाजले. यामुळे पोलिस ठाण्यासमोर एकच धावपळ सुरू झाली. जमाव पांगविण्यात आला. त्याही परिस्थितीत सदाशिवराव किटे, नत्थू पहेलवान यांनी शहीदांचे मृतदेह गोळा केले.

दामले गुरुजींचे आव्हान
पाच सहा जणांचा जीव गेल्याचे पाहून दामले गुुरुजी मॅजिस्ट्रेट जयवंत यांच्यापुढे आले आणि माझ्यावर गोळी चालव असे आव्हान केले. दुसऱ्या दिवशी शोकाकूल वातावरणात शहीदांची अंत्ययात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील ही घटना आजही येथील नागरिकांसाठी शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देते.

सविस्तर वाचा - राज ठाकरेंच्या मागणीनंतर वडेट्टीवारांनी केली स्वाक्षरी! वाचा नेमके काय

राष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी स्मारकाकरिता जागा देऊन शहीद स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तेव्हापासून येथील शहीद स्मारक स्वातंत्र्यवीरांची स्मृती जपत आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून आणखी एका हुतात्मा स्मारकाचे बांधकाम करण्यात आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid smarak at Tumsar