Video : शंकरपटात आता धावतात बैलांऐवजी "हे'... वाचा 

भगवान पवनकर 
Friday, 17 January 2020

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यात असलेल्या डोंगरगाव येथे तब्बल 103 वर्षांपासून तीळ संक्रांत सणानिमित्त बैलांचा इनामी शंकरपट भरविण्यात येत होता.

मोहाडी (जि. भंडारा) : गावखेड्यात पूर्वापार शंकरपट भरविण्याची परंपरा होती. या शंकरपटात धावण्यासाठी धष्टपुष्ट बैलांच्या जोड्या खास पोसल्या जात होत्या. यावर हजारो - लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले जात होते. मात्र, अलीकडे बैलांच्या शंकरपटावर शासनाने बंदी आणल्याने शौकिनांचा हिरमोड झाला. मात्र, म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. शंकरपट शौकिनांनी मग यावर पर्याय म्हणून आता ट्रॅक्‍टरांचा पट भरवायला सुरुवात केली आहे. 

 

बैलांऐवजी धावले ट्रॅक्‍टर

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यात असलेल्या डोंगरगाव येथे तब्बल 103 वर्षांपासून तीळ संक्रांत सणानिमित्त बैलांचा इनामी शंकरपट भरविण्यात येत होता. परंतु, काळाच्या ओघात बैलाची संख्या कमी झाली. त्यात न्यायालयाने शंकरपटाच्या आयोजनावर बंदी घातली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण इटणकर यांचे संकल्पनेतून प्रथमच ट्रॅक्‍टरचा रिव्हर्स इनामी शंकरपट भरविण्याचे ठरले. बुधवारी, 15 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी ट्रॅक्‍टरच्या शंकरपटाचे उद्‌घाटन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक सदानंद इलमे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मधुकर फुलबांधे आणि प्रभाकर समरीत यांच्या प्रमुख उपस्थितीत या अनोख्या शंकरपटाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

अवश्‍य वाचा- सावकारी कर्जाचे ओझे उतरणार! 

अनोखा शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

ट्रॅक्‍टरच्या शंकरपटाच्या उद्‌घाटनाच्या दिवशी म्हणजे बुधवारी सात ट्रॅक्‍टर स्पर्धेत सहभागी झाले होते. गुरुवारी स्पर्धेचा अंतिम दिवस होता. या दिवशी तब्बल 24 ट्रॅक्‍टर आणि त्यांचे चालक स्पर्धेत सहभागी झाले होते. पहिलेच वर्ष असताना ट्रॅक्‍टरच्या शंकरपटाला गावकऱ्यांसह बाहेरगावच्या नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. कमीत कमी वेळात ठराविक अंतर गाठणाऱ्या चालक-मालकास रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shankarapat now runs "This' ... instead of bulls