बोबडेंनी बुरख्यातील हेमामालिनीची मांडली बाजू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता. त्यावेळी, अभिनेत्री हेमामालिनी अवघ्या 19 वर्षांच्या होत्या. न्यायालयामध्ये येणे सोयीचे व्हावे, कोणी ओळखू नये म्हणून हेमामालिनी यांनी बुरखा परिधान केला होता. 

नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता. त्यावेळी, अभिनेत्री हेमामालिनी अवघ्या 19 वर्षांच्या होत्या. न्यायालयामध्ये येणे सोयीचे व्हावे, कोणी ओळखू नये म्हणून हेमामालिनी यांनी बुरखा परिधान केला होता. 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी महाराष्ट्रातील, विशेष म्हणजे मूळचे नागपूरकर असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांच्या नावाची शिफारस झाल्याची आज घोषणा झाल्यानंतर शहरातील विधी क्षेत्रातील वकील, न्यायाधीश आणि न्यायमूर्तींनी आनंदाची भावना व्यक्त केली. तसेच, शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे आपल्या नागपूरचे दुसरे व्यक्ती असतील, असेही अभिमानाने नमूद केले. यापूर्वी हा बहुमान माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हिदयतुल्ला यांच्या रूपाने शहराला मिळाला होता. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूरमध्ये झाला. वडील अरविंद बोबडे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. तर, थोरले बंधू विनोद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ होते. त्यामुळे, त्यांना आपल्या घरातूनच वकिली व्यवसायासाठी बाळकडू मिळाले. त्यांनी सत्तरच्या दशकामध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण शहरातील सेन्ट फ्रान्सिस दी सेल्स हायस्कूल (एसएफएस) मधून पूर्ण केले. विधी शाखेची पदवी 1978 साली घेत सनद मिळविली. त्यानंतर, त्यांनी आपला वकिली शहरामध्ये व्यवसाय सुरू केला. 1998 साली वरिष्ठ विधिज्ञ आणि 29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे ऑक्‍टोबर 2012 साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आणि एप्रिल 2013 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. न्यायमूर्ती शरद बोबडे नागपूर खंडपीठामध्ये वकिली करताना खूप हुशार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. मुद्दे टिपून योग्य पद्धतीने न्यायालयात मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. इंग्रजी सोबतच संस्कृत आणि वेदांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विद्यापीठाकडून टेनिस खेळताना त्यांनी टेनिसचे "कोर्ट'सुद्धा गाजवले आहे. यासोबतच, त्यांना वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड आहे. नागपूरमध्ये असताना सुट्यांच्या काळामध्ये विविध अभयारण्यांमध्ये ते जंगल सफारीसाठी जात असत. त्यांनी न्यायाधीश म्हणून एक वर्ष नागपुरात आपली सेवा दिली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांना हा बहुमान मिळाल्यास माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हिदयतुल्लांनतर नागपुरातील सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे ते दुसरे नागपूरकर नागरिक ठरतील. 

न्यायालयात मांडली एक लाख शेतकऱ्यांची बाजू 
न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी वकिली करताना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोलाचे कार्य केले. शेतकरी नेते शरद जोशी यांच्याबरोबर चळवळीमध्ये ते सक्रिय होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करताना त्यांनी एका प्रकरणात एक लाख शेतकऱ्यांची बाजू न्यायालयामध्ये मांडली होती. बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करू शकत नाही म्हणून लाखाच्या वर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad bobde, chief justice of india, hema malini