esakal | पवार-आंबेडकर एकत्र आल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया!
sakal

बोलून बातमी शोधा

pawar-ambedkar

जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतरच्या भेटीवर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

पवार-आंबेडकर एकत्र आल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया!

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोलाः राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. भाजप-शिवसेनेच्या ब्रेकअपनंतरही हे अधिकच दृढ झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘गांधी शांती’ यात्रेच्या निमित्ताने एकत्र येणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीने अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


राजकारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नेहमी क्रमांक एकचा विरोधक म्हणून बघितले आहे. अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीच्या मुद्यावरूनही आंबेडकर यांनी काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करावयास सांगितले होते. काँग्रेसने आघाडीबाबत एमआयएमची अट टाकताच आंबेडकरांनी राष्ट्रवादीची अट टाकून पवारांविरुद्धची आपली भूमिका जगजाहिर केली होती.

राजकारणातील या घटना अजूनही स्मृतीपटलावरून विस्मृतीत गेल्या नसतानाच पवार-आंबेडकर यांचे मुंबईत एकत्र येणे अनेक राजकीय शक्यतांना जन्म देणारी घटना ठरली आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी तीन-चार जागांची आवश्‍यकता असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे तेवढ्या जागा असल्यामुळे मुंबईत पवार-आंबेडकर यांचे एकत्र येणे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. देशातील राजकीय परिस्थितीत हे दोन्ही नेते एकत्र आले असले तरी या भेटीतून दृष्टीपथास येणाऱ्या अशक्यप्राय राजकीय शक्यता वास्तवात येण्याची शक्यताही नाकारता येण्यासारखी नाही. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.


यापूर्वीही दोन्ही नेते आले होते एकत्र
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर पवार-आंबेडकर विरोध पर्व सुरू झाले. त्यापूर्वी मात्र हे दोन्ही नेते राज्यात काही काळासाठी एकत्र आले होते, हे वस्तूस्थिती आहे. आता राज्यात बदललेल्या राजकीय वातावरणात पवार यांनी शिवसेनेलासुद्धा एकत्र घेतले तेथे आंबेडकर यांना सोबत घेवून आणखी एक धक्का तर पवार राज्यातील राजकीय वर्तुळाला देणार नाहीत ना, अशी चर्चाही रंगू लागली आहे.