अन्‌ नशेत तिने केला सीपी कार्यालयासमोर राडा... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

दारूच्या नशेत युवतीने (वय 27) पोलिस आयुक्तालयासमोर मित्रासोबत गदारोळ घातल्यामुळे राडा झाला. सीपी कार्यालयात कार्यालयीन कामासाठी आलेल्या महिला हेडकॉन्स्टेबलनी मध्यस्थी करून नशेत असलेली युवती व तिच्या मित्र मैत्रिणीला फ्रेजरपुरा ठाण्यात नेऊन सोडले. 

अमरावती : मूळ नागपूर येथील रहिवासी व एक स्थानिक युवती शुक्रवारी (ता. 16) दुपारी बाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या. त्यापैकी अमरावती शहरातील ही युवती नशेत होती. नागपूरच्या युवतीने मित्राला फोन करून बोलविले होते. अमरावतीत पोहोचलेल्या युवकाने सामान्य स्थितीत असलेल्या मैत्रिणीला कारमध्ये बसविले. 

परंतु त्याचवेळी नशेत असलेली अमरावतीच्या युवतीनेही मैत्रिणीसोबत त्याच कारने नागपूरला जाण्याचा हट्ट धरला. बसस्थानकासमोर हा प्रकार आधी काहींनी बघितला. मद्यपी युवती जबरदस्तीने कारमध्ये बसली, ही कार बसस्थानकासमोरून पुढे निघाली. तेवढ्यात एक युवक दुचाकीने त्याच्या कारचा पाठलाग करीत पोलिस आयुक्तालयापर्यंत पोहोचला. 

आरडाओरड सुरूच

त्यामुळे कार रस्त्यालगत थांबली. नशेतील युवतीला तिच्या मित्राने नागपूरला न जाण्याचा सल्ला दिला. परंतु तिने मित्रालाही जुमानले नाही. तिची आरडाओरड सुरूच होती. 

शिवीगाळ सुरू केली 

नशेतील युवतीची, मित्र मैत्रिणीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल सात ते आठ मिनीट आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर हा धुमाकूळ सुरूच होता. नशेतील युवतीने शिवीगाळ सुरू केली. तेवढ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाहन आयुक्तालयाच्या आत येण्याच्या तयारीत असल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आले. 

जाणून घ्या : रानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली, अन्‌...

चौघांना फ्रेजरपुरा ठाण्यात आणले 

फ्रेजरपुरा ठाण्यात एक वरिष्ठ महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल कार्यालयीन कामासाठी आयुक्तालयात आली. त्यांनी नशेत असलेल्या युवतीचे प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले गैरवर्तन बघून, तिला आटोक्‍यात आणले. व्हॅनमध्ये ती युवती, तिचा मित्र आणि मैत्रीण अशा चौघांना फ्रेजरपुरा ठाण्यात आणून सोडले. पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले. 

प्रतिबंधात्मक कारवाई
नशेतील युवतीची वैद्यकीय तपासणी केली. तिच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गदारोळ घातल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली. 
- पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा, ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She drunk in front of the CP's office at amravati.