
अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमचे यांची कन्या व आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दिवसांपासून त्या तणावात होत्या असे काही दिवसांपूर्वी आमटे कुटुंबीयांनी सोशल माध्यमावर टाकलेल्या निवेदनात म्हटले होते.
आनंदवनात आमटे कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. येथेच डॉ. शीतल आमटे-करजगी राहतात. महारोगी सेवा समितीच्या सीईओ म्हणून त्या काम बघत होत्या. सोमवारी त्यांनी आपल्याच निवासस्थानी हाताला इंजेक्शन टोचले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जाणून घ्या - नागपुरात दिवसा थरार : वाहतूक पोलिस कर्मचारी बोनेटवर आणि कार सुसाट
काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. काही तासभरात नंतर चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती. दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.
डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल आमटे-करजगी या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. डॉ. शीतल आमटे यांनीही समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
संपादन - नीलेश डाखोरे