मुलीची काळजी असणाऱ्या कुटुंबात तुझा पुनर्जन्म व्हावा, गौतम यांचा आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्ष निशाणा; लिहिली भावूक पोस्ट

टीम ई सकाळ
Wednesday, 27 January 2021

शीतल आमटे यांच्या जन्मदिनाला त्यांचे पती गौतम करजगी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नागपूर : आपल्या मुलीची काळजी असेल अशा घरात तुझा पुनर्जन्म होईल, अशी आशा मला आहे. तसेच त्या घरात तुला भरभरून आई-वडीलांचे प्रेम मिळो, असे म्हणत गौतम यांनी पुन्हा आमटे कुटुंबीयांकडे बोट दाखविले आहे. शीतल आमटे यांचा २६ जानेवारीला जन्मदिवस होता. त्यावेळी त्यांचे पती गौतम करजगी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.  

हेही वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला

काय आहे पोस्ट? -
'तू अजूनही माझ्याबरोबर नाहीस, यावर माझा विश्वास बसत नाही. मला इथून तुला वाढिदिवासाच्या शुभेच्छा द्याव्या लागेल, असे कधीच वाटले नव्हते. ४० वर्षानंतर कसे जगावे, याबाबत आपण अनेक योजना आपण आखल्या होत्या. तू नेहमीच म्हणायची, की जीवनात वर्ष मोजत जगण्यापेक्षा नेहमी जीवन जगणे गरजेचे आहे. शीतल तू माझा चमकता तारा होतीस आणि नेहमी राहशील. तूच मला आनंदवनाशी जोडलेस आणि माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिलास. तू एक उत्तम मुलगी, मैत्रिण, पालक, आई आणि बायको होतीस. तू बाबा आणि ताईंच्या तत्वाचे तंतोतंत पालन करत होतीस. तुला ज्यांची काळजी होती त्यांनी आपला विश्वासघात केला. त्यामुळे या गोष्टीचे मला फार दुःख वाटते. आपल्यापासून सुटका करण्यात ते यशस्वी झाले. मात्र, तुझ्यापासून आनंदवन वेगळे करण्यात त्यांना कधीच यश येणार नाही. कारण तू बाबा आणि ताईंच्या बाजूला जागा मिळविली आहेस', असे शीतल आमटेंचे पती गौतम करजगी म्हणाले. शीतल यांच्या जन्मदिवशी गौतम यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, गेल्या ३० नोव्हेंबरला शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आमटे कुटुंबीयांवर अनेक बाजूंनी टीका करण्यात आली होती. आता शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी आपल्या पोस्टमध्ये देखील आमटे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sheetal amte husband gautam karjgi post on social media on her birthday