धानपिकाला अद्याप शिंदीचेच ‘बंध’न; प्राचीन परंपरा

Shindi is still bound to the paddy crop
Shindi is still bound to the paddy crop

गडचिरोली : ‘ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मो का ये संबंध है’ करण-अर्जुन या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत केवळ मानवांनाच नाही तर धानपीक आणि शिंदीच्या झाडांनाही लागू होते. कारण, आजही धानपिकाची कापणी झाल्यावर धानाचे भारे बांधण्यासाठी शिंदीच्याच दोऱ्या अर्थात बंध लागतात. त्यामुळे ही प्राचीन परंपरा अद्याप कायम असून, धानपीक अजूनही शिंदीच्या ‘बंध’नात स्वत:ला बांधून घेणे पसंत करते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जगातील प्राचीन अन्नधान्यापैकी तांदूळ अर्थात धानपीक मानले जाते. जगातील विशेषत: आशिया खंडात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धानासाठी प्रसिद्ध आहेत. पूर्वी कधीतरी धान कापल्यावर शेताच्या बांधीतच असलेल्या शिंदीच्या पानांचा उपयोग धानाचे भारे बांधण्यासाठी झाला असावा.

त्यानंतर आजतागायत ही परंपरा तशीच सुरू आहे. बदलत्या काळात नारळाच्या दोरीपासून नायलॉनच्या दोऱ्या, तार, प्लॅस्टिकच्या दोऱ्या असे अनेक प्रकार आले. पण, धानाच्या भाऱ्याला शिंदीचेच बंध बांधण्याची रीत कायम आहे.

खरीप हंगामात बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. यात कुणी हलका, कुणी मध्यम (मजवा), तर कुणी जड धान लावतात. हलका धान लवकर तयार होतो तर जड धानाला तयार व्हायला उशीर लागतो. पण, साधारणत: दसरा, दिवाळीची चाहुल लागत असताना धान कापणीस तयार झालेले असतात.

वातावरणात गारवा जाणवायला लागतो. भल्या पहाटे गवतावर चमकदार दवबिंदू दिसायला लागतात आणि हिरव्यागार धानपिकाचा रंग सोनपिवळा होऊ लागतो. तेव्हा ग्रामीण भागात शिंदीचे बंध तयार करण्याची लगबग सुरू होते. त्यासाठी शिंदीच्या पानांचे गठ्ठे आणले जातात. विशेष म्हणजे ही पाने मोठ्या उंच झाडांची कधीच तोडली जात नाहीत.

जंगलात, शेतशिवारात शिंदीची झुडपे मोठ्या प्रमाणात उगवलेली असतात. त्याची लांब पाने आणली जातात. मग, घरातील पुरुष मंडळी शिंदीचे बंध बांधण्यात मग्न होतात. काही प्रमाणात महिला हे काम करीत असल्या तरी बहुतांश पुरुष मंडळीच बंध तयार करीत असतात. शिंदीचे बंध तयार केले की, धान कापणीनंतर धानाचे भारे बांधले जातात.

मग मजबूत बांबूच्या काठीला दोन्ही बाजूंनी अणकुचीदार टोक करून त्या दोन टोकांना दोन भारे अडकवले जातात. मग, ही एक प्रकारची कावड खांद्यावर घेऊन जिथे धानाची डिबली (ढिग) तयार करायची आहे तिथे ठेवले जातात. अनेक वर्षे लोटली आणि धान बांधायचे अनेक पर्याय असले, तरी आजही धानासाठी शिंदीच्या बंधांनाच पहिली पसंत आहे.

मेहनतीचे व एकाग्रतेचे काम

शिंदीचे बंध तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी असते. शिंदीची पाने लांब फांदीला दोन्ही बाजूंनी लागलेली असतात. या फांदीचे टोक कुऱ्हाडीचा दांडा, लाकडाची फळी, दगड किंवा वजनदार वस्तूने ठोकतात. मग मऊ झालेल्या दोन फाद्यांच्या टोकांची गाठ बांधून बंध तयार करण्यात येते. पण मोठ्या संख्येने बंध तयार करायचे असल्याने हे बरेच मेहनतीचे व एकाग्रतेचे काम आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com