
अमरावती : दर्यापुरातील शिवसेना शिंदे गटात
दर्यापूर (जि. अमरावती) - शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल होण्याचे सत्र सुरू असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरातही शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे दर्यापूर तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात काल सायंकाळी दर्यापुरातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामिल होण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी माहिती श्री. अरबट यांनी दिली.
शिवसेनेचे ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गोपाल अरबट व रवींद्र गणोरकर हे दर्यापुरातील शिवसेनेचे नेते पूर्वीपासूनच माजी खासदार अडसूळ यांच्या संपर्कात होते. अडसूळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दर्यापुरातही या संबंधात धुसफूस सुरू झाली होती. हा मतदारसंघ दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून त्यांच्या पाठीशी असल्याचे गोपाल अरबट यांनी सांगितले.
ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडवी यांची अमरावती येथे काल शिवसैनिकांसमवेत गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर दर्यापूर तालुक्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गोपाल अरबट यांनी दिली. आज दर्यापूर येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये प्रामुख्याने गोपाल अरबट यांच्या समवेत रवींद्र गणोरकर, विनय गावंडे, महेंद्र भांडे, राहुल भुंबर, राहुल गावंडे, श्री. दुराटे, श्री. कोरडे, श्री. काठोळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती गोपाल अरबट यांनी दिली आहे. या प्रवेशामुळे आता शिंदे गटाचे वर्चस्व अमरावती जिल्ह्यात वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीवर चालणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना बघतो. दर्यापूर मतदारसंघातील शिवसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ व आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनात तसेच ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडवी यांच्या नेतृत्वात आम्ही दर्यापुरातील शिवसैनिकांनी शिंदे गटात समावेश घेतला आहे.
- गोपाल अरबट, शिवसेना नेते, दर्यापूर.
Web Title: Shiv Sena In The Shinde Group In Daryapur Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..