कुणामुळे अमरावतीत कोण झाले नाराज...

सुरेंद्र चापोरकर
Friday, 24 July 2020

वेंकय्या नायडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला अशी भावना शिवसैनिकांची झाली आहे. नायडू यांनी केलेल्या विधानावरून उफाळून आलेल्या वादाचे पडसाद अमरावतीतसुद्धा उमटले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध नोंदविला.

अमरावती : राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी नवीन खासदारांच्या शपथविधीच्या वेळी केलेल्या वक्तव्याची सध्या बरीच जोरदार चर्चा सुरू असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटले आहे. वेंकय्या नायडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला अशी भावना शिवसैनिकांची झाली आहे.
नायडू यांनी केलेल्या विधानावरून उफाळून आलेल्या वादाचे पडसाद अमरावतीतसुद्धा उमटले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध नोंदविला.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेतील खासदारांच्या शपथविधीच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर हे तुमचे घर नाही, माझे चेंबर आहे. येथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत, तुम्ही नवीन आहात, पुढच्या वेळी लक्षात ठेवा, असे विधान वेंकय्या नायडू यांनी केले. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी संतापले. भाजपची शिवाजी महाराजांबद्दल असलेली खोटी भावना यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी येथील जिल्हाकचेरीच्या परिसरात वेंकय्या नायडू व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

वाचा - 35 हजार कुटुंबांवर का आली उपासमारीची वेळ...वाचा

जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, शिवसेना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणा देत त्यांनी वेंकय्या नायडू यांचा निषेध नोंदविला. शिवरायांच्या जयघोषावर आक्षेप घेणाऱ्या सभापती नायडू यांनी एकप्रकारे शिवरायांचा अवमान करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. अशा शिवरायविरोधी भाजप व सभापतींचा निषेध करीत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले. सुनील खराटे, श्‍याम देशमुख, राजेश वानखडे, दिनेश बूब यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हाकचेरीसमोर निदर्शने केली. तसेच सभापती नायडू व भाजपचा निषेध करीत घोषणाबाजी केली.

संपादन - नरेश शेळके  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsainik Angry over Venkaiah Naidu's Statement