यवतमाळात शिवसेनेचे आंदोलन, दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा भरचौकात तुडवला

राजकुमार भितकर
Saturday, 12 December 2020

आता तर काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून हे सर्व लज्जास्पद असल्याची टिका पराग पिंगळे यांनी केली आहे

यवतमाळ : केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केंद्रीय राज्यमंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. या वक्तव्याच्या विरोधात आज यवतमाळात शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रावसाहेब दानवेंचा पुतळा भरचौकात तुडवला. 

हेही वाचा - VIDEO : दानवे भैताड माणूस, वडेट्टीवारांची जीभ घसरली

भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुद्धीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार करीत आहे. आता तर काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून हे सर्व लज्जास्पद असल्याची टिका पराग पिंगळे यांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या सर्वच पदाधिका-यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा भरचौकात तुडवला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा जप्त केला. याप्रसंगी पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, किशोर इंगळे, संजय रंगे, सागरताई पुरी, पिंटू उर्फ नितीन बांगर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे उपस्थित होते.

हेही वाचा - Powerat80 : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले साहेबांबद्दल...

रावसाहेब दानवे नशेत टीका करतात - 
यापूर्वी सुद्धा रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शिवी दिली होती. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम दानवे करीत आहे. हे सर्व ते मद्य पिऊन करतात काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख, शिवसेना, यवतमाळ जिल्हा

हेही वाचा - दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची...

जीभ कापणाऱ्यास दहा लाख - 
रावसाहेब दानवे हे सतत शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल, अशी घोषणा मी आज केली. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे तुम्हीही निघा. शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही.
-संतोष ढवळे, संपर्क प्रमुख, यवतमाळ विधानसभा 

हेही वाचा - मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

रावसाहेब दानवेंना मंत्री पदावरुन निष्कासीत करा -
रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरित रावसाहेब दानवे यांना मंत्रिपदावरून निष्कसित करावे व भाजपमधून बाहेरचा रस्ता दाखवावा. 
-पराग पिंगळे, शिवसेना, जिल्हा प्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena agitation against raosaheb danve in yavatmal