VIDEO : दानवे भैताड माणूस, वडेट्टीवारांची जीभ घसरली

अतुल मेहेरे
Saturday, 12 December 2020

वडेट्टीवार म्हणाले, हा भैताड माणूस राजकारणात कसा काय आला, हेच कळत नाही. बरं आला तर आला, पण भाजपने याला मंत्रीही करून टाकले. ज्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, बोलण्याचे भान नाही, अशा माणसाला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्‍नचिन्ह आहे.

नागपूर :  दिल्लीत शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन हे चीन आणि पाकिस्तान या देशांकडून पुरस्कृत असल्याचे वक्तव्य भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत. याबाबत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. दानवे भैताड माणूस आहे. एकदम येडपट आहे, असे ते म्हणाले.

 

हेही वाचा - दोन वाघ एकमेकांवर भिडले, लढाईदरम्यान एकाचा मृत्यू

वडेट्टीवार म्हणाले, हा भैताड माणूस राजकारणात कसा काय आला, हेच कळत नाही. बरं आला तर आला, पण भाजपने याला मंत्रीही करून टाकले. ज्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, बोलण्याचे भान नाही, अशा माणसाला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्‍नचिन्ह आहे. हा माणूस काहीतरी शोध करत असतो. कार्टून माणूस, इब्लीस माणूस जे करतो, नेमके तेच काम हा करत आहे. 

हेही वाचा - उपराजधानीत ऑनर किलिंग : बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला खून; तीन दिवसांतील तिसरे...

बच्चू कडूंनी तर म्हटले आहे की, याला घरात घुसून मारले पाहिजे. पण त्याहीपूर्वी याच्या कमरेत डावा मारा किंवा उजवा मारा, एक मारलाच पाहिजे. केव्हा काय बोलावं, याचं भान त्या दानवेला कधी राहिलं आहे का? कीव येते भारतीय जनता पक्षाची की, अशा लोकांना पक्षाचा प्रदेशाध्यक्ष केलं आणि केंद्रात राज्यमंत्री केलं. या पक्षाची काही विचारधारा आहे की नाही आणि असेल तर कुठल्या थराला गेली आहे, याची कल्पना दानवेच्या वक्तव्यावरून येते, असे वडेट्टीवार म्हणाले. 

हेही वाचा - शरद पवार भूतकाळ, वर्तमानकाळ अन् भविष्यकाळही - विजय वडेट्टीवार

कृषिप्रधान देशात जो शेतकऱ्यांचा अनादर करतो, त्याला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे. ज्या शेतकऱ्यांशी त्यांच्या पक्षाचे नेते देशाचे कृषिमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान चर्चा करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी जर त्या आंदोलनात असतील, तर मग यांचे नेते त्यांच्याशी चर्चा कशाला करत आहेत, असा प्रश्‍न विजय वडेट्टीवार यांनी केला. या वक्तव्याचे परिणाम दानवेला भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar criticized raosaheb danve in nagpur