शिवसैनिक म्हणाले, 'ही' तर राणा दाम्पत्याची नौंटकी

shivsena leader criticized rana couple in amravati
shivsena leader criticized rana couple in amravati

अमरावती - मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले. मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये बसून महाराष्ट्र चांगला होणार नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्या, असे त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. राणा दाम्पत्याची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार म्हणून रवी राणा यांची कामगिरी शून्य आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी राणा दाम्पत्याने मेळघाटात जाऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. जिल्हाप्रमुख प्रवीण हरमकर आणि श्‍याम देशमुख यांनी सांगितले की, दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत राणा दाम्पत्याकडून कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. हे जनतेलाही कळून चुकले आहे. मेळघाटमध्ये समस्यांचा डोंगर असताना खासदार म्हणून नवनीत राणा यांनी आजवर काय केले? त्या केवळ पीकनिकसाठी मेळघाटात जात असतात, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापूर्वीसुद्धा आमदार रवी राणा यांनी आपल्यासोबत २५ आमदार असल्याचा दावा केला होता. मात्र, कालांतराने तो पुढे खोटा निघाला. बडनेरा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. मेळघाटात काम करण्यास भरपूर वाव आहे, असे असताना खासदार आणि आमदार म्हणून राणा दाम्पत्याचे कुठलेही भरीव योगदान दिसत नाही.

मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करून राणा दाम्पत्य स्टंटबाजी करीत असल्याचे व्हिडिओवरून दिसून येते, असा आरोप प्रवीण हरमकर यांनी केला. बडनेरा येथे उघडकीस आलेला कोट्यवधींचा शौचालय घोटाळा, मनपातील इतर प्रश्‍नांबाबत आमदार राणा यांनी चुप्पी का साधली, असा प्रश्‍नसुद्धा त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला प्रदीप बाजड, आशिष धर्माळे, राहुल माटोडे, प्रकाश मंजलवार, गोपाळ मंजलवार, पंजाब तायवाडे, आशिष ठाकरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

जनतेने सेनेला त्यांची जागा दाखवून दिली -
खरे जनसेवक कोण, याची प्रचिती शिवसेनेला आली आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विधानसभेचा सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडत आहोत. मुख्यमंत्री फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत आहेत, तर आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आहोत. हा फरक आहे. टीका करणाऱ्यांना यापूर्वी जनतेने त्यांची जागा दाखविली आहे.
- रवी राणा, आमदार, बडनेरा.

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com