अत्यावश्‍यक सेवेशिवाय अन्य दुकानांना आठवड्यातून तीन दिवस सशर्त परवानगी

Shops will remain open three days in a week, conditions apply
Shops will remain open three days in a week, conditions apply
Updated on

भंडारा : कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात येथील नगर परिषदेने अत्यावश्‍यक सेवेशिवाय इतर दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यात सुरू होणारी दुकाने आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवता येणार असून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना संबंधितांना करावी लागणार आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन वेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला. यात जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, व्यवसाय, प्रतिष्ठाने, संस्था, कार्यालये, उद्योग बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे किराणा दुकान, दूधविक्री आणि कृषी मालाच्या विक्रीला परवानगी देण्यात आली होती. आता तीन मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले तरी, केंद्र व राज्य सरकारद्वारे विविध व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले होते. त्यामुळे आवश्‍यक सेवेशिवाय इतर व्यवसाय व दुकाने सुरू करण्यावरून व्यावसायिकांत संभ्रम निर्माण झाले होते. त्या पार्श्‍वभूमिवर आज, मंगळवारी येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ढेरे यांनी इतर दुकाने उघडण्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अत्यावश्‍यक सेवेतील भाजी, फळ, दूध, किराणा, खानावळी, गॅरेज व कृषी विषयक दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
याशिवाय हार्डवेअर, बांधकाम साहित्य, इलेक्‍ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोबाइल, टायर-ट्यूब, कार बाईक शोरूम, भांडीविक्री, मोबाईल दुरुस्ती व विक्री, फोटो शॉप, स्वीट मार्ट ही दुकाने दर रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच कापड दुकान, चप्पल-बूट दुकान, ज्वेलरी, टेलर, स्टेशनरी, गिफ्ट सेंटर, बुक स्टॉल, वॉच सेंटर, झेरॉक्‍स ही दुकाने दर सोमवार, गुरुवार व शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. सदर दुकानातून सेवा देताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझर यांचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच भविष्यात कधीही कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास या सर्व तरतुदी रद्द करण्यात येतील असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

ही दुकाने अजूनही बंदच

लॉकडाऊनचा सव्वा महिन्याचा कालावधी संपला आहे. आता तिसऱ्या टप्प्यात दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळेल अशी छोट्या व्यावसायिकांना आशा होती. परंतु, नगर परिषदेच्या क्षेत्रातील चहा-पान टपऱ्या, ज्यूस सेंटर, हॉटेल, उपाहारगृहे, चायनीज सेंटर केशकर्तनालय, आईसक्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्‍स, गुपचूप सेंटर स्पा, स्नॅक्‍स कॉर्नर, ढाबे ही दुकाने बंदच राहणार आहेत. तसेच जिम, स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, स्वीमींग पूल, बिअर बार, क्रीडा व करमणूकीची ठिकाणे, सामाजिक व धार्मिक ठिकाणे तिसऱ्या टप्प्यातही बंदच ठेवावी लागणार आहेत.

"तळीरामच' सर्वाधिक निराश

ऑरेंज झोनमधील भंडारा जिल्ह्यात तीन मे नंतर बिअर बार नाही तर, दारू विक्रीची दुकाने तरी सुरू होतील, अशी आशा येथील तळीरामात निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाला दारू विक्रीतून विषाणू संसर्गाची अधिक शक्‍यता दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यात देशी-विदेशी दारू विक्रीच्या दुकानांना परवानगी दिलीच नाही. याचा धक्का महिनाभरापासून घशाला कोरड पडलेल्या तळीरामांना बसला आहे.

तुमसरमध्येही दुकाने सुरू

ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात राज्य शासनाने काही आस्थापना व उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी तुमसर शहरात बहुतांश ठिकाणी सकाळी दुकाने उघडण्यात आली. शहरात कापड दुकाने, बुक स्टॉल, मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जनरल स्टोअर्स यासह बरीच दुकाने सुरू करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com