esakal | लस मिळेल का लस? सोशल मीडिया ग्रुपवर एकमेकांना विचारणा; तुटवडा कायम

बोलून बातमी शोधा

vaccine
लस मिळेल का लस? सोशल मीडिया ग्रुपवर एकमेकांना विचारणा; तुटवडा कायम
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः "शहरात कुठे लस उपलब्ध आहे का?, कोणत्या रुग्णालयात आहे?, अशा एक ना अनेक प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. लशींचा तुटवडा पाहता अनेक लसीकरण केंद्रे बंद पडलेली आहेत. जिथे सुरू आहेत तेथेसुद्धा नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना कुठे लस मिळते का? याचा शोध आता नागरिक घेताहेत.

हेही वाचा: मेडीकलचे वॉचमन रुग्णांना करतात दमदाटी; कोरोनाग्रस्तांच्या भावनांशी खेळ

सामान्यपणे सोशल मीडियाला दुषणे दिली जातात, मात्र कोरोना काळात याच सोशल मीडियाने अनेकांना जीवनदान दिले, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. लशीसोबतच प्लाझ्मा, ऑक्‍सिजन बेड, व्हेंन्टिलेटर बेडसच्या उपलब्धतेबाबत विविध सामाजिक ग्रुपमधून गरजूंकडून विचारणा होत असून अनेकजण आपल्या परीने त्यांना मदत करताना दिसत आहेत किंबहुना तसा प्रयत्न तरी करीत आहेत.

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे पूर्णपणे ठप्प झालेली असून आता नागरिकांना लशींचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून अनेक गरजू लशींबाबत विचारणा करीत आहेत. जिल्ह्यातील 125 पैकी केवळ 10 ते 12 केंद्रांवरच सध्या टप्प्याटप्याने लसीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्येही लशी संपल्या असून लसीकरण तूर्तास बंद, असे फलक लावण्यात आलेले आहे.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

प्रशासकीय यंत्रणेचे कानावर हात

लशींचा पुरवठा केव्हा होणार?, किती लशी येणार, उपलब्ध किती? याबाबतची कुठलीही माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. केवळ लशी संपल्याचे फलक लावून आरोग्ययंत्रणेने आपले हात झटकून घेतले आहेत. राज्यावरून पुरवठा होईल, तेव्हाच लस मिळणार, असे उत्तर नागरिकांना दिले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ