esakal | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डीची अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

बोलून बातमी शोधा

null

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डीची अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी (ता. एक) येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यामुळे त्यांची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

दोन दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान श्रीनिवास रेड्डी यांनी धारणी पोलिस ठाण्याच्या लॉकपमध्येच राहावे लागले होते. यादरम्यान त्यांची सखोल चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौकशीचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

दरम्यान, शनिवारी रेड्डींच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने धारणी पोलिसांनी त्यांना परत एकदा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रेड्डींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात रेड्डींची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. यावेळी तपास अधिकारी पूनम पाटील, पोलिस निरीक्षक विलास कुळकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते व त्यांची चमू उपस्थित होती.

हेही वाचा: नागपुरातील शासकीय इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच

अहवालातील निरीक्षणांची प्रतीक्षा

अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांच्या संदर्भातील चौकशी केली असून त्यांना 30 एप्रिलपर्यंत चौकशी अहवाल सादर करावयाचा होता. तो त्यांनी सादर केला किंवा नाही याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या अहवालात कोणती निरीक्षणे त्यांनी नोंदविली, याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

वनविभागाच्या समितीचे काय?

वनविभागाने गठित केलेल्या नऊ सदस्यीय चौकशी समितीने आतापर्यंत कोणत्या पद्धतीने चौकशी केली याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. शिवकुमार तसेच रेड्डींच्या अटकेनंतर ही समिती गुंडाळण्यात आली काय? असा प्रश्‍नसुद्धा करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ