सर, मला आज सुटी द्या! राजकीय भूकंपाने व्यथित शिक्षकाचा सुटीचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

जहीर यांनी तातडीने प्राचार्यांना सुटीचा अर्जसुद्धा लिहिला. या अर्जात त्यांनी नमूद केले की, "आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपामुळे आपण पुरता हललो आहे. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्याकरिता मला एक दिवसाची सुटी हवी आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील एका शिक्षकाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिलेला सुटीचा अर्ज आज, शनिवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. "महाराष्ट्रात शनिवारी सकाळी अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मी पुरता खचलो आहे. त्यातून सावरण्यासाठी मला एक दिवसाची सुटी हवी आहे. ती मंजूर करावी', असे या शिक्षकाने अर्जात म्हटले आहे. तो अर्ज व्हायरल होऊन सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. 

शपथविधीचे वृत्त प्रसारीत 

जिल्ह्यातील गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात जहीर एस. सय्यद हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज, शनिवारी भल्या पहाटे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. सत्ता स्थापनेची सुतराम शक्‍यता नसणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी-सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याचवेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे चित्र माध्यमांतून समोर आले. 

शिक्षक जहीर यांना धक्का 

कोणाच्याही ध्यानीमनी नसताना भल्या पहाटे आलेल्या या राजकीय भूकंपामुळे राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा धक्का बसला. यात जहीर सय्यद या शिक्षकाचाही समावेश होता. सकाळीच ही वार्ता कानी पडल्यानंतर ते खचून गेले. त्यांना काय करावे काहीच कळत नव्हते. कॉलेजमध्ये जाण्याची तर मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी सुटी घेण्याचा विचार केला. 

प्राचार्यांना लिहिला सुटीचा अर्ज 

जहीर यांनी तातडीने प्राचार्यांना सुटीचा अर्जसुद्धा लिहिला. या अर्जात त्यांनी नमूद केले की, "आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपामुळे आपण पुरता हललो आहे. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्याकरिता मला एक दिवसाची सुटी हवी आहे. तरी आज मला एक दिवसाची रजा मंजूर करावी', अशी विनंती त्यांनी अर्जातून केली. मात्र, येथेही त्या शिक्षकाचे नशीब आडवे आले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जहीर सय्यद यांचा सुटीचा अर्ज नामंजूर करून त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले. बिच्चारे शिक्षक! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir, give me a leave today! Teacher application for political earthquake