आजवर जिने राखी बांधली तीच उठली जीवावर, अन्‌ घडली ही भयंकर घटना... 

सुरेंद्र चापोरकर
Thursday, 9 July 2020

अमरावती शहरातील अकोली मार्गावरील दत्तविहार कॉलनीत व्यास ले-आउट परिसरात गजानन तुपटकर आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका खाजगी शाळेत लिपिक आहेत. त्यांना पत्नी आणि मुलगी निकिता (वय 21) आणि मुलगा स्वराज (वय 10) अशी दोन अपत्ये.

अमरावती : बहीण भावाचे नाते अतूट असते. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे हे बंध असतात. मोठी बहीण लहान भावाला पोटच्या गोळ्याप्रमाणे वागवते. त्यातच वयाचे अंतर जर जास्त असेल तर ती त्याची मायही होते, प्रसंगी वडिलांसारखा कठोरपणाही दाखवते. परंतु हे सारे त्याच्या काळजीतून, प्रेमातून करते. परंतु जेव्हा मोठी बहीणच लहान भावाच्या जीवावर उठते तेव्हा... 

अमरावती शहरातील अकोली मार्गावरील दत्तविहार कॉलनीत व्यास ले-आउट परिसरात गजानन तुपटकर आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका खाजगी शाळेत लिपिक आहेत. त्यांना पत्नी आणि मुलगी निकिता (वय 21) आणि मुलगा स्वराज (वय 10) अशी दोन अपत्ये. कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन असलेला देश हळूहळू अनलॉक होत असला तरी सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ते कधी सुरू होणार याबाबतही काही सांगता येत नाही. त्यामुळे मुले घरीच आहेत. 

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
 

कोरोनामुळे गजानन तुपटकर यांची दोन्ही मुलं निकिता आणि स्वराज घरीच असायचे. मुलगी मोठी असल्याने तिच्या आवडीनिवडी अर्थातच वेगळ्या होत्या. तर मुलगा स्वराज अवघा दहा वर्षांचा असल्याने टीव्हीवरील लहानग्यांच्या मालिकांमध्ये तो रमायचा. टीव्ही पाहण्यावरून दोघांमध्ये अधूनमधून बाचाबाची व्हायची, असे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

गुरुवारी दुपारी आई-वडील दोघेही घरी नव्हते. घरी निकिता आणि स्वराज दोघेच होते. दोन ते चारच्या दरम्यान कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात मोठी बहीण निकिताने लहान भाऊ स्वराजच्या डोक्‍यात बत्ता हाणला. लहानग्या स्वराजच्या डोक्‍यावर बत्त्याचा जोरदार प्रहार बसताच त्याच्या डोक्‍यातून रक्‍त वहायला लागले. बहिणीचे कपडेही रक्‍ताने माखले. आपल्या हातून भयंकर घटना घडल्याचे उमगताच निकिताने घरून पळ काढला. तत्पूर्वी रक्‍ताने माखलेले कपडे तिने बदलून घेतले. 

अकोली मार्गावरील दत्तविहार कॉलनीतील व्यास ले-आउट परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहर हादरले असून, सर्वत्र या खुनाचीच चर्चा आहे. वडील गजानन तुपटकर यांची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया खोलापुरीगेट पोलिसांनी सुरू केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अतुल घारपांडे अधिक तपास करीत आहेत. 

घटनेच्या वेळी स्वराज व त्याची बहीण निकिता दोघेच घरी असल्याने दोघांमध्ये वाद नेमका कशावरून झाला, हे सांगता येत नसले तरी टीव्ही पाहण्यावरून त्यांच्यात कुरबूर सुरू रहायचे, असे शेजाऱ्यांनी सांगितले. तरी नेमके झाले काय, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले असता स्वराजचा मृतदेह एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घराबाहेर असलेल्या त्याच्या आई-वडिलांना त्याची माहिती देण्यात आली. 

घरात रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला मुलाचा मृतदेह, जिच्या भरोशावर मुलाला सोडून जायचे ती मोठी बहीण निकितासुद्धा घरात नव्हती. आई-वडिलांना हे दृश्‍य बघून आश्‍चर्याचा धक्काच बसला. शेजाऱ्यांसह गजानन तुपटकर यांनी खोलापुरीगेट ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक अतुल घारपांडे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली. घरातील लोखंडी बत्त्याने ठेचून हत्या केल्यानंतर रक्ताचे डाग तिच्या कपड्याला लागले होते. त्यामुळे तिने घरातून बाहेर पडण्यापूर्वी रक्ताने माखलेले कपडे काढून दुसरा ड्रेस घालून पळ काढला. वृत्त लिहिस्तोवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई खोलापुरीगेट पोलिसांनी सुरू केली होती. 
 

आरोपीचा शोध सुरू 
बहिणीने लहान भावाची निर्घृण हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. पसार निकिताचा शोध सुरू आहे. 
-अतुल घारपांडे, पोलिस निरीक्षक, खोलापुरीगेट ठाणे. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister murdered younger brother in Amravati