Video : देवदर्शनासाठी गेले अन्‌ दैव आड आले; भीषण अपघातात सहा ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

देवदर्शन घेऊन घरी परतण्यासाठी निघालेल्या सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. स्कॉर्पिओ चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला नादुरुस्त ट्रक न दिसल्याने हा भीषण अपघात झाला. ही घटना बुधवारी रात्री 10. 45 वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. 

चंद्रपूर : जिल्ह्यातील रहिवासी भोयर व झोडे कुटुंबीय देवदर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे गेले होते. दिवसभर तिथेच वेळ घालवल्यानंतर रात्री उशिरा घरी परतण्यासाठी निघाले. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. केसलाघाट ते नागाळा मार्गावर स्कॉर्पिओने रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला व दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. ही घटना बुधवारी (ता. 19) रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ येथील रहिवासी संभाजी भोयर (77), कुसुम भोयर (65), जियान भोयर (दीड वर्ष), दत्तू झोडे (50), मीनाक्षी झोडे (33) व शशीकला वांढरे (65) हे सर्वजण स्कॉर्पिओ गाडीने भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेतल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा घरी परतण्यासाठी मूल मार्गे निघाले. 

मोठी बातमी - अंकिताला जाळणा-या आरोपीने कारागृहात केला आत्महत्येचा प्रयत्न?

चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट ते नागाळा मार्गावर चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात भोयर व झाडे कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील व रेखा खटिकर अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थही एकच गर्दी केली होती. या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. 

चालकाला दिसला नाही ट्रक

भरधाव असलेल्या स्कॉर्पिओ चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा असलेला नादुरुस्त ट्रक दिसलाच नाही. अशातच काहीही कळायच्या आता स्कार्पिओ ट्रकला मागून धडकली. यात सहा जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींसह मृतांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six killed in accident at Chandrapur district