
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी एक मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध होणार होती. त्यामुळे त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, या तयारीत राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार होते.
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतींमधील निवडणुकींसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. एक मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, मतदारयादी कार्यक्रमात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर वाजण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, राळेगाव व मारेगाव या सहा नगरपंचायतींचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२० रोजी समाप्त झाला आहे. तेव्हापासून या ठिकाणी प्रशासक कामकाज पाहत आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्रशासनाकडून नगरपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली होती.
अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली
राजकीय पक्षांनीही निवडणुकीसाठी कंबर कसली. उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले होते. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी एक मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध होणार होती. त्यामुळे त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, या तयारीत राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार होते.
मात्र, मतदारयादीच्या कार्यक्रमात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नगरपंचायतींवर प्रशासक असणार आहे. साधारणतः एप्रिल महिन्यात सहा नगरपंचायतींसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इच्छुकांचा हिरमोड
मार्च किंवा एप्रिल महिन्यात निवडणुका होईल, अशी शक्यता होती. त्यामुळे राजकीय पक्ष तयारीला लागले होते. इच्छुकांनी प्रचाराला सुुरुवातही केली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अजूनही अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झालेली नाही. परिणामी निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारी सुरू केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. राज्य निवडणूक आयोग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.