काय म्हणता? त्या सहा जणांनी घातली पोलिसांशीच हुज्जत! मग काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

या प्रकरणाचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून आणखी काही लोकांवर कारवाईची शक्‍यता आहे.

आष्टी, (जि.गडचिरोली )  : पोल्ट्री फार्म मालकाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणे सहा जणांना महागात पडले असून त्यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामकृष्णपूर येथील पोलिस पाटील प्रतिभा मंगल मिस्त्री यांनी आपल्या घराजवळ पोल्ट्री फार्म तयार केला. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरात दुर्गंधी पसरली, या कारणास्तव पोल्ट्री फार्म हटविण्यात यावे अशी तक्रार 14 ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन आष्टी येथे दिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, हवालदार रामटेके रामकृष्णपूर येथे गेले. यावेळी  पोलिस पाटील प्रतिभा मिस्त्री यांना पोल्ट्री फार्म हटविण्याची सूचना देऊन परत निघाले असता प्रतिभा मंगल मिस्त्री यांनी पोलिसउपनिरीक्षक जयदीप पाटील यांना फोन केला व दहा ते बारा इसमांनी माझ्या मुलाला मारहाण केली असे सांगितले.
प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील यांनी जादा कुमक सोबत घेऊन तत्काळ रामकृष्णपूर गाठले व त्यांनी दीपक सरकार, विपुल सरकार यांना त्यांच्या राहते घरून ताब्यात घेतले . त्यानंतर दिलीप दास यांच्या घरून त्यांच्या मुलास ताब्यात घेण्यासाठी गेले असता,दिलीप दास याने वॉरंटची विचारणा करून पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. परत जात असताना दिलीप दास, भगीरथ दास,दीपक सरकार, विपुल सरकार, आशू सरकार, तुषार मिस्त्री यांनी गावातील काही इसमांना एकत्र करून पोलिसांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. संचारबंदीचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा - वस्त्रनिर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला

या प्रकरणाचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून आणखी काही लोकांवर कारवाईची शक्‍यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी व पोलिस कर्मचारी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six persons quaralled with police