आपट्याची पाने ओरबाडल्याने विणीच्या हंगामातील फुलपाखरे संकटात, पर्यावरणाचे नुकसान

file photo
file photo

नंदोरी (जि. वर्धा) : निसर्गात वृक्षवेलींना महत्त्वाचे स्थान आहे. यावरच निसर्ग साखळीतील पशुपक्ष्यांचा अधिवास असतो. दिवसेंदिवस सिमेंटची जंगले वाढत आहेत. मात्र, प्रथा, परंपरेच्या नावाखाली आपट्याची, पळसाची कत्तल होत असल्याने पशु-पक्ष्यांचा अधिवास दिवसेंदिवस संकटात सापडत चालला आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेच्या नावाखाली सोने म्हणून वाटण्यात येणारी आपटा, ज्वारीची पाने ओरबाडली जात आहेत. मात्र यामुळे आपट्याच्या झाडावर फुलपाखरांची अंडी नष्ट होऊन फुलपाखरांचे अस्तित्वच धोक्‍यात येत आहे.

सप्टेंबर ते नोव्हेंबर हा फुलपाखरांचा विणीचा हंगाम

सप्टेंबर ते नोव्हेंबर हा फुलपाखरांचा विणीचा हंगाम असतो. आपल्याकडे आढळणाऱ्या ब्लॅक राजा, एमिर्ग्यांट प्रजातींची फुलपाखरे आपट्याच्या पानावर अंडी घालतात. दसऱ्याला ती पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे. त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून झाड अक्षरशः ओरबाडून टाकण्यात येते. त्याचा फटका मात्र फुलपाखरांना बसत आहे.

आपट्याच्या झाडावर आपल्याकडे आढळणाऱ्या ब्लॅकराजा, एमिर्ग्यांट प्रजातींची फुलपाखरे अंडी घालून पुढील पिढीचा विस्तार करते. या दरम्यान झाडांना कोवळी पालवी फुटलेली असते. फुलपाखरांच्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या छोट्या अळ्या ती पाने खातात, त्यावरच त्यांची वाढ होते.


फुलपाखरांवर आपत्ती

दसऱ्याच्या पूजेसाठी आपट्याची पाने पुजण्याची, सोने म्हणून वाटण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यासाठी शेत शिवारातून झाडे ओरबाडली, तोडली जातात. परिणामी यामुळे फुलपाखरांवर आपत्ती कोसळते.


फुलपाखरांच्या प्रजाती वाचवा
आपल्याकडे आढळणाऱ्या ब्लॅक राजा, एमिर्ग्यांट फुलपाखरांच्या प्रजातींचा आपट्याच्या झाडावर अधिवास असतो. त्यावर ही फुलपाखरे अंडी घालतात. त्यामुळे ही झाडे प्रथा, परंपरेच्या नावाखाली ओरबाडणे चुकीचे आहे. त्यांना वाचविण्यासाठी आपट्याची झाडे वाचविणे, नवीन लावणे आवश्‍यक आहे. अन्यथा आपल्याकडे आढळणाऱ्या फुलपाखरांच्या या प्रजाती दिसणार नाहीत.
- प्रवीण कडू
पक्षीमित्र, हिंगणघाट


स्वतःसह इतरांची सुरक्षितता महत्त्वाची
सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कोरोनाबाधिताने आपट्याचे पान (सोनं) दिल्यास त्याच्या हातामध्ये असलेले विषाणू दुसऱ्या व्यक्तीला बाधित करू शकतात. सण, उत्सव ही आपली परंपरा आहे. यंदा कोरोनाची साथ असल्याने स्वतःसह इतरांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. नियमित हात धुणे, मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्‍यक आहे.
- प्रा. गौवर घुगरे

मोबाईलद्वारे द्या शुभेच्छा संदेश
प्रथा, परंपरेच्या नावाखाली आपट्याची झाडे तोडण्याऐवजी रोपे लावून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा शुभमुहूर्त आजच्या दिवशी करा. कोरोना प्रादुर्भाव सुरू असल्याने सण, उत्सवाच्या निमित्ताने गर्दी न करता मोबाईलद्वारे शुभेच्छा संदेश, प्रत्यक्ष भेट झाल्यास मास्क व सॅनिटायझर देऊन सणाचा आनंद व्यक्त करणे शक्‍य आहे.
- आशीष भोयर
अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन संस्था हिंगणघाट.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com