esakal | बालगृहाला कंटाळून ती पडली बाहेर अन् रडत बसली रस्त्यावर… वाचा पुढे 
sakal

बोलून बातमी शोधा

childhome

रस्त्यावर एक मुलगी रडत असल्याचे बघून दोन सुज्ञ लोकांनी तिला जेवायला घालून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आणले. फ्रेजरपुरा पोलिसांनी दुपारीच न्यायालयासमोर तिला हजर केले.

बालगृहाला कंटाळून ती पडली बाहेर अन् रडत बसली रस्त्यावर… वाचा पुढे 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः शहराच्या गाडगेनगर हद्दीत असलेल्या एका संस्थेच्या बालगृहात मन रमत नसल्याने त्या मुलीने संधी बघून बालगृह सोडले. रस्त्यावर रडत असल्याने दोन सुज्ञ नागरिकांनी तिला जेवायला घातले. त्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांच्या मदतीने मुलींच्या सुधारगृहात पाठविले. मात्र, या सर्व प्रक्रियेत पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. बुधवारी (ता. नऊ) सकाळीच ही घटना घडली. 

आई-वडिलांपैकी कुणीच नसल्यामुळे मागील दोन वर्षांपासून ही १४ वर्षीय मुलगी गाडगेनगर परिसरातील बालगृहात राहते. येथे एकोणवीसच्या आसपास मुली आहेत, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी (ता. नऊ) सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही मुलगी बालगृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आली. तिला काही सुचेनासे झाले त्यामुळे ती रस्त्यावर रडायला लागली.

रस्त्यावर एक मुलगी रडत असल्याचे बघून दोन सुज्ञ लोकांनी तिला जेवायला घालून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आणले. फ्रेजरपुरा पोलिसांनी दुपारीच न्यायालयासमोर तिला हजर केले. तिच्या शरीरावर काही जखमा आहेत. तिला सदर बालगृहात राहणे असह्य होत असल्याचे तिने सांगितल्याने परत त्याच ठिकाणी न पाठविता न्यायालयीन आदेशाने मुलींच्या सुधारगृहात पाठविले होते. 

इकडे गाडगेनगर पोलिस ठाण्यात रात्री त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा रात्री दाखल केला. मुलीचे वय आणि पालनपोषण करणारे कुणीच नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी मध्यरात्रीनंतर दोन वाजेपर्यंत गाडगेनगर पोलिसांनी एनजीओंची मदत घेऊन शोधकार्य सुरू ठेवले. ज्या बालगृहातून ती बाहेर पडली तेथील इतर मुलींशी चर्चा केली. त्या मुलीचे दप्तर तपासले. मोबाईल क्रमांकावर अनेकांशी संपर्क साधला.


अवश्य वाचा- वेदनादायक डॉक्टरचाच उपचाराविना मृत्यू
 

बाहेर शोधण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना गाडगेनगर पोलिसांनी सोबत चालण्याचा आग्रह धरला असता पोलिसांना सहकार्य झाले नाही, असे पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले. अखेर लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी खांडपासोळे यांची मदत घेतल्यानंतर गाडगेनगर पोलिस निष्कर्षापर्यंत पोहोचले. गुरुवारी (ता. दहा) फ्रेजरपुरा पोलिसांशी संपर्कानंतर प्रकरणाचा उलगडा झाला. 

अवश्य वाचा- आम्हाला दगू द्या, आमची आर्थिक लूट थांबवा
 

सुरक्षारक्षक होता दारावर गैरहजर 

बालगृहाच्या प्रवेशद्वारातून अल्पवयीन मुलगी बाहेर पडली तेव्हा रखवालदार प्रवेशद्वारासमोर हजर नव्हता, असे चौकशीअंती पुढे आले. मुलगी निघून जाण्याच्या काही तासांपासून तो तेथून गायब होता, असे पोलिसांनी सांगितले. 

अनाथ मुलगी बालगृहातून बाहेर पडणे ही बाब गंभीर आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशी केली जाईल. तसा अहवाल संबंधितांना पाठवू. 
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image
go to top