esakal | अबब! चार आसनी वाहनात शेकडो प्रवासी!...स्मार्ट ग्राम बिबीचा 'आदर्श' घोटाळा उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर : अभ्यास दौऱ्यात वापरण्यात आलेले वाहन.

फेब्रुवारी- २०२० मध्ये बिबी ग्रामपंचायतीने आदर्श ग्राम अभ्यास दौरा शेकडो गावकऱ्यांसह केला. मात्र, या दौऱ्याचे बोगस बिल दाखवून सरपंच,उपसरपंचांनी स्मार्ट ग्राम निधीतील २ लाख ४२ हजार रुपयांची उचल केली. आदर्श दौऱ्यानिमित्त प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या ५० आसन क्षमतेची खासगी बस चक्क चार आसनी गाडी निघाली. त्यामुळे शंभर एकजण या वाहनात गेलेच कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अबब! चार आसनी वाहनात शेकडो प्रवासी!...स्मार्ट ग्राम बिबीचा 'आदर्श' घोटाळा उघडकीस

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : कोरपना तालुक्‍यातील स्मार्ट ग्राम बिबी सध्या नवनवीन घोटाळ्याने चर्चेत आले आहे. गावातील रास्त भाव दुकान अनियमिततेमुळे निलंबित झाले. गावात वॉटर एटीएमचा निधी वितरित होऊन प्रत्यक्षात केवळ भूमिपूजन फलक अस्तित्वात असल्याचे समोर आले. आता, पुन्हा एक घोळ माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे.

ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावकरी असे शंभर एकजण एका चारचाकी (चार आसनी) वाहनातून अभ्यास दौऱ्याला गेले आणि लाखो रुपये खर्च केले. या ‘आदर्श' प्रवासाची चर्चा सध्या पंचक्रोशीत चांगलीच रंगली आहे.

फेब्रुवारी- २०२० मध्ये बिबी ग्रामपंचायतीने आदर्श ग्राम अभ्यास दौरा पाटोदा, शनिशिंगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार येथे शेकडो गावकऱ्यांसह केला. मात्र, या दौऱ्याचे बोगस बिल दाखवून सरपंच मंगलदास गेडाम व उपसरपंच आशीष देरकर यांनी स्मार्ट ग्राम निधीतील २ लाख ४२ हजार रुपयांची उचल केली. आदर्श दौऱ्यानिमित्त प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या ५० आसन क्षमतेची खासगी बस चक्क चार आसनी गाडी निघाली. त्यामुळे शंभर एकजण या वाहनात गेलेच कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

चार आसनी तीन वाहने

बिबी ग्रामपंचायतीच्या बिलात पन्नास आसनी खासगी बस (एमएच ३४ बीएफ -००२४) दाखविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात हे चारचाकी वाहन असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आहे. उपसरपंच देरकर गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळात काम करतात. या संस्थेचे सचिव धनंजय गोरे यांच्या मालकीचे ते वाहन आहे. तसेच मीनी बस (एमएच ३४ बीएफ -०५३०) आणि बस (एमएच -३४ बिएफ -८५०९) यांचाही वापर अभ्यास दौऱ्यात केल्याचे दाखविण्यात आले. परंतु तेही बोगस निघाले आहे. ही दोन्ही वाहने चार आसनी आहेत. त्यामुळे चार आसनी तीन वाहनांत शेकडो प्रवासी गेलेच कसे, असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार स्मार्ट ग्राम निधी खर्च करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. मात्र, आवश्‍यक कामांवर निधी खर्च करण्याऐवजी बोगस आणि शासनाची फसवणूक करणारे बिलावर या रकमेची उचल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच संतोषकुमार पावडे, चंद्रशेखर चटप, स्वप्नील झुरमुरे, राजेश खनके, सुनील भोयर, हबीब शेख, संतोष उपरे यांनी केली आहे. उपसरपंच देरकर यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीची चूक यात असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.

जाणून घ्या : औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली जीवतीची भाजी झालीय दुर्मीळ

लोकवर्गणी झाली गायब

आदर्श गाव अभ्यास दौऱ्यानिमित्त गावकऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये लोकवर्गणी काढण्यात आली. वर्गणी देणाऱ्यांनाच आदर्श दौऱ्यात नेण्यात आले. लाखो रुपयांची लोकवर्गणी गावकऱ्यांकडून घेऊनही २ लाख ४२ हजारांची बोगस बिले जोडून रक्कम उचल करण्यात आली. सरपंच, उपसरपंचाने गावकऱ्यांची लोकवर्गणीही गायब केली असून निधी असताना लोकवर्गणीचा पैसा गेला कुठे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top