Video : कमालच झालं की, विक्रीसाठी आणलेल्या भांड्यांतून निघाले हे... 

प्रमोद काकडे 
गुरुवार, 9 जानेवारी 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रीचा एक वेगळा नमुना वरोरा शहरातील बोर्डा भागात बघायला मिळाला. घरोघरी, गल्लीबोळात भांडे विक्री करण्याच्या बहाण्याने निघालेल्या एका विक्रेत्याजवळ पोलिसांना 50 हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा सापडला.

चंद्रपूर : अवैध दारूची विक्री करण्यासाठी नवनवी शक्कल दारू तस्कर लढवित असल्याचे आपण रोजच वृत्तपत्रांमधून वाचतो. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे एका दारू तस्कराने दारू विकण्यासाठी वापरलेली शक्कल पोलिसांनाही चक्रावून सोडून गेली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या अंमलबजावणीला येत्या मार्च महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील दारू तस्करी विनाअडसर सुरूच आहे. पोलिसांनी कित्येक मोहिमा व कडक नाकाबंदी करूनही लाखो लिटर दारू चोरट्या मार्गाने शहर व जिल्ह्यात पोहोचत आहे. 

भांड्यांमध्ये लपवून दारूची विक्री 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रीचा एक वेगळा नमुना वरोरा शहरातील बोर्डा भागात बघायला मिळाला. घरोघरी, गल्लीबोळात भांडे विक्री करण्याच्या बहाण्याने निघालेल्या एका विक्रेत्याजवळ पोलिसांना 50 हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा सापडला. आपल्या दुचाकी वाहनावर भांडे रचून गल्लीबोळात भांड्यांऐवजी त्यात लपवून ठेवलेली दारू विकली जात असे. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यासाठी सापळा रचण्यात आला. पोलिसांनी या आरोपीला वरोरा पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्या भांड्यांमध्ये लपवलेला दारूसाठा बाहेर काढताच पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. 

 

50 हजारांची देशीदारू जप्त

एक- दोन नव्हे तर चक्क 50 हजार रुपयांची देशीदारू या भांड्यांमधून जप्त करण्यात आली. पोलिसांनी हा दारूसाठा मुद्देमालासह ताब्यात घेतला असून अजय मथेवार या आरोपीला अटक केली आहे. त्याने हा दारूसाठा कुठून आणला व विक्री कुणाकडे करणार होता या सर्वांचा पोलीस छडा लावत आहेत. चंद्रपूरच्या गल्लीबोळात "भांडे घ्या भांडे'च्या आडून "दारू घ्या दारू' असेच या विक्रेत्यांना म्हणायचे आहे.  

 

हेही वाचा - समीरने लावली अंकुशच्या गळ्यावर तलवार, नंतर घडला हा थरार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smuggling in chandrapur crime news