दारूवर चाप मात्र काळ्या सोन्याचं काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी; नेते आणि वेकोलि अधिकाऱ्यांची हातमिळवणी

श्रीकांत पशेट्टीवार 
Sunday, 31 January 2021

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या केंद्रस्थानी सध्यातरी जिल्ह्यात दारू हाच विषय आहे. या विषयाच्या आडूनच अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत.

चंद्रपूर ः जिल्ह्यात अवैधरीत्या दारूच्या पुरवठ्यावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दारूवरून पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत आहे. पोलिस दारूचा साठा जप्त करून आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. मात्र, वेकोलिच्या खाणींनी व्याप्त या जिल्ह्यात कोळसा तस्करीचे मोठे रॅकेट सुरू आहे. कोळशाच्या तस्करीत महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. वेकोलिचे अधिकारी आणि बड्या राजकीय नेत्यांच्या हातमिळवणीतून तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या केंद्रस्थानी सध्यातरी जिल्ह्यात दारू हाच विषय आहे. या विषयाच्या आडूनच अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत. त्यातील कोळसा तस्करी एक. जिल्ह्यात कुंभार खैनी, सास्ती, पोवनी-2, पद्‌मापूर, लालपेठ, पैनगंगा , नीलजई -2 आणि कोलगाव आदी वेकोलिच्या कोळसा खाणी आहे. याच खाणीत कोळसा तस्करांचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

वेकोलि अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून रात्री कोळसा तस्करीचा काळा धंदा केला जातो. वीस ट्रक कोळसा काढण्याची परवानगी असेल तर तीस ट्रक कोळसा वेकोलितू बाहेर पाठविला जातो. शहराच्या वेशीवरील प्लॉटवर खाली केला जातो. पाच हजार रुपये प्रतिटन दराने तो खुल्या बाजारात विकला जातो. एकाच वाहतूक परवान्यावर अतिरिक्त कोळशाची वाहतूक केली जाते. यात शहरातील नामांकीत कोळसा व्यापारी आणि ट्रान्स्पोर्ट गुंतले आहे. पोलिसांचे त्यांना पाठबळ असल्याने कारवाई होत नाही. 

दुसऱ्या प्रकारात रेल्वे वॅगनमधून जास्तीचा कोळसा संबंधित कंपन्यांना पाठविला जातो. एका रॅकमध्ये साधारणतः ऐंशी टन कोळसा बसतो. एका वॅगनमध्ये 56 रॅक असतात. यातील दहा ते बारा रॅकमधून अतिरिक्त कोळसा पाठविला जातो. मागील अनेक वर्षांपासून तस्करी सुरू आहे. परंतु अपवाद वगळता कारवाई होत नाही. 

नक्की वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

वेकोलिचे बडे अधिकारी, राजकीय नेते आणि तस्करांची श्रृखंला तयार झाली आहे. याच साखळीच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांच्या राष्ट्रीय संपत्तीची चोरी होत आहे. आता पोलिसांनी दारू सोबत कोळसा तस्करीवरही चाप लावण्याची गरज निर्माण झाला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smuggling of Coal in Chandrapur district